राहूल झाडे, बारामती.
प्रत्येकालाच कटिंग करायला महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी हेअर सलून ची वाट धरावी लागते. सहसा आपला प्रत्येकाचाच कटिंग वाला फिक्स असतो. माझाही आहे. आपलाही असेलच!! मनाजोगी कटिंग करणारा प्रत्येकालाच आवडतो. असाच एक अवलिया हेअर स्टायलिश, ज्याच्याकडे मागील काही वर्ष मी जात आहे. तो म्हणजे आकाश.! सूर्यनगरीतील श्री हॉस्पिटल शेजारी त्याचं हे सलून आहे.
आपण चार पुस्तक वाचतो आणि त्याच्यामागे असणारं खूप मोठं तत्वज्ञान जगाला सांगत असतो.लेखकाने आपलं लिहायचं काम चोख बजावलेले असते,पण ती पुस्तकं लोकांपर्यंत पोचवायच काम सामान्य वाचकच करत असतो.सांगायचा मुद्दा हा की आकाश हा माझा नेहमीचा हेयर स्टायलिस्ट म्हणजे मराठीत कटिंग वाला.
त्याला आपलं हे दररोजच काम करत असताना, वाचायची आवड लागली. त्यातून आकाश परिस्थितीमुळे जेमतेम 12 वी शिकलेला. वाचनाची आवड असल्यामुळे, त्याने आपल्या दुकानातच एक छोटेखानी ग्रंथालय चालू केलं. म्हणजे नॉर्मली हेअर सलूनच्या दुकानात टेबलावर वर्तमानपत्र किंवा हेअर स्टाइल्स च एखादं जुनं खराब झालेलं मॅगझिन सहसहा पडलेल असतं.
कटींगचा आपला नंबर यायला वेळ आहे म्हणल्यावर आपणही बिनकामाच्या बातम्या वाचत बसतो. तसेच कुठली हेयर स्टाईल कशी आहे, ते तरी बघत बसतो. निदान मी तरी बसतो. काही नाही, तर मोबाइल आहेच. पण आकाश जरी कमी शिकलेला असला, तरी त्याची पुस्तकांची आवड त्याने जपली आहे. नामांकित लेखकांची पुस्तकं त्याने टेबल वर ठेवली आहेत. एखादा पाहुणा घरी यावा आणि त्याच्यापुढे बदाम, पिस्ता, काजू बरोबरच गरमा गरम भजी, चहा पुढे यावा अशी माझी अवस्था झाली.
ययाती, पावनखिंड, इंत्रेप्रिनुयार, महाश्वेता अशी सुधा मूर्ती, वि. स. खांडेकर, शरद तांदळे अशा लेखकांची काही निवडक पण मस्त पुस्तकं याच्या दुकानात टेबलावर ठेवलेली आहेत. पहिल्या वेळेस मी गेलो तर मला वाटले, ही कुणीतरी ग्राहकाने आणून ठेवली असतील. त्यामुळे आकाशला मी काही बोललो नाही. पण एक महिन्याने गेल्यावर मला ती पुस्तक परत दिसली. मग मला यामागचं गुपित समजलं. नंतर आकाशबरोबर गप्पा मारताना त्याने मन मोकळं केलं.
त्याने सांगितले, सर लोकांना वाचायला आवडतं. तसं मलाही, घरी वेळ मिळत नाही. सगळा वेळ इथेच दुकानात जातो.जसा वेळ मिळेल तसं मी वाचतो आणि ग्राहक ही वाचत असतात. त्याचं हे म्हणणं ऐकलं आणि भारी वाटलं. आकाश सारखी मुलं कमी शिकलेली असली, तरी अनेक पुस्तकांचं तत्वज्ञान ते खऱ्या अर्थाने स्वतः जगत आहेत.
साहित्यात आपण अनेक जण काम करत असताना, आकाश सारख्या पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या युवकांमुळे खरं तर महाराष्ट्रातील साहित्याचा वारसा टिकुन आहे आणि वाढतही आहे. जिथे आज प्रत्येक जण Insta, FB, WhatsApp आणि बरंच काही याच्यात बिझी आहोत, त्यात आकाशसारखी पोरं कामातून वेळ मिळेल तसं वाचन करत हा वारसा खऱ्या अर्थाने जपत आहेत.
मराठी साहित्यात खरंच जादू आहे. अनेक नवीन लेखक नवनवीन विषयावर लिखाण करत साहित्याचा महामेरू पुढे नेत असताना, आकाश सारखी पोरं याच साहित्याला जन-सामान्यांपर्यंत पोचवत आहेत. आमच्या सारख्या लेखकाला अजून काय पाहिजे? पुस्तकं पाहिल्या पाहिल्या बारामती साहित्य कट्ट्याची आठवण झाली.पण असाही हेयर स्टाईल वाचक कट्टा आहे बारामतीत मित्रहो…नक्की भेट द्या!











