राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस घाटाच्या पायथ्याशी सोलापुरवरून प्रवासी घेऊन पुणेकडे निघालेल्या खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १५ ते १८ प्रवासी गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत.
सत्यभामा शिवराव बोचने (तालुका निलंगा ) अशा मृत्यू झालेल्या एका प्रवाशाचे नाव असून एका मृत प्रवाशाची ओळख पटली नाही. जखमी झालेल्या प्रवाशांची माहिती घेण्याचे काम पोलीस करीत आहेत. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी ( दि २६ )पहाटे सोलापूर वरून खाजगी लक्झरी बस ३० ते ४० प्रवाशांना घेऊन पुणे कडे भरधाव वेगाने जात होती.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस घाटाच्या पायथ्याशी महामार्गावर रस्त्याच्या कडेला टायर फुटल्याने बसने उभा असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पंधरा ते सोळा जण प्रवासी हे गंभीर मार लागल्याने जखमी झाले आहेत.
या जखमींना पोलिसांनी पाटस दौंड व परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. ह्या अपघातात लक्झरी बसचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तर सिमेंट मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधील सिमेंट मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच,पाटस पोलीस चौकीचे उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी, श्रीहरी पानसरे, रोहीदास जाधव, रविंद्र ठाकुर तसेच पाटस टोल नाका प्लाझा कंपनीचे व राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक सुरक्षा पथकाने धाव घेतली. यावेळी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. याबाबत पुढील अधिक तपास पाटस पोलीस करीत आहेत.











