बारामती : महान्यूज लाईव्ह
नगरपरिषदेच्या प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केलेल्या बारामती शहरातील खाजगी 18 कोचिंग क्लासेस व अकॅडमी वर प्रशासनाने कारवाई करत टाळे ठोकले. या संदर्भात नगरपरिषद व प्रशासन यंत्रणेने अग्निशमन यंत्रणा या अकॅडमीमध्ये कार्यान्वित करण्याच्या सूचना वारंवार दिल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करणे या अकॅडमींना महागात पडले आहे.
बुधवारी नगरपरिषद प्रशासनाने ही कारवाई केली दिवसभर केलेल्या कारवाईत शहरातील अठरा खाजगी कोचिंग क्लासेस व अकॅडमी वर ही कारवाई करण्यात आली. जिथे अकॅडमी चालत आहेत अशा ठिकाणी प्रशासनाने अग्निशमन यंत्रणा व इतर सुरक्षेचे उपाय तातडीने अवलंबावेत अशा प्रकारच्या वारंवार सूचना केल्या होत्या गेल्या. अनेक महिन्यांपासून प्रशासन सांगत असूनही दुर्लक्ष करणाऱ्या अकॅडमींवर प्रशासनाने ही टाळेठोक कारवाई केली.
दरम्यान प्रशासनाने या संदर्भात वारंवार लेखी सूचना केल्या असतानाच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोहसीन पठाण यांनी देखील खाजगी अकॅडमीचे शुल्क व तेथील सुविधा या संदर्भात उपोषण केले होते. त्याचाही परिणाम या कारवाईच्या माध्यमातून झाला आहे .
मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी अग्निशमन दलाचे पर्यवेक्षक पद्माकर कुल्लरवार यांना या संदर्भात ज्या अकॅडमी नियमबाह्य पद्धतीने सुरू आहेत आणि त्यांनी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही अशा अकॅडमी शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चार जून 2023 रोजी पहिली नोटीस प्रशासनाने या खाजगी कोचिंग क्लासेस व अकॅडमींना दिली होती. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा ही नोटीस देऊन अखेर प्रशासनाने कारवाई केली. ज्या अकॅडमींनी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता केली नाही अशा 18 अकॅडमींवर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.











