शिरुर : महान्यूज लाईव्ह
शिरुरला दुचाकी घसरुन मागुन येणा-या वाहनाने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज बुधवार (दि.२५) रोजी सकाळी घडली आहे.
या अपघातात सिद्धी चंद्रकांत गावडे (रा. टाकळी हाजी) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,सिद्धी गावडे ही वडिलांसोबत दुचाकीवर टाकळी हाजी गावाकडुन शिरुरकडे येत होती. रामलिंग रोडजवळ रोशननगर येथे आली असताना रस्त्यावर दुचाकी घसरुन मागुन येणा-या अवजड वाहनाची धडक बसल्याने सिद्धी ही गंभीर जखमी झाली.
स्थानिकांनी तत्काळ उचलून दवाखान्यात नेले, मात्र तोपर्यंत सिद्धीचा दु्र्दैवी मृत्यु झाला. घटनेची माहीती कळताच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील, पोलिस हवालदार राजेंद्र वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान ज्या ठिकाणी अपघात घडला, त्या ठिकाणी खडी पसरल्यानेच अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत.











