इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील कुरवली आणि हिंगणेवाडी येथे आज नागरिकांनी शपथ घेत मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकीय पक्षांना गावबंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये लोकांनी शपथ घेतली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला.

राज्यातील 500 हून अधिक गावांमध्ये मागील आठवड्यापर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. आता त्यामध्ये दररोज काही गावे वाढू लागली आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर लोकांमध्ये संतापाची भावना वाढू लागली आहे.
आज इंदापूर तालुक्यातील कुरवली येथे सर्व समाजाच्या नागरिकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला, तसेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत या गावांमध्ये कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता येऊन भाषण करणार नाही अथवा जाहीर कार्यक्रमास हजेरी लावणार नाही अशा स्वरूपाची घोषणा देखील यावेळी ग्रामस्थांनी केली. एकूणच या भागात मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुरवली येथे हा निर्णय घेत असतानाच हिंगणेवाडी येथे देखील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकत्र येत मराठा आरक्षण वेळेपर्यंत हिंगणेवाडी परिसरातही कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. थोडक्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे लोण आता गावागावात पोहोचू लागले असून येणाऱ्या काळात या गावांमध्ये भर पडण्याची चिन्हे आहेत.











