राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड: प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलासाठी 50000 रुपयांची लाच मागितली त्यातील दहा हजार रुपयांची लाच घेताना दौंड येथील प्रधानमंत्री आवास योजनेचा दौंड नगरपरिषदेचा अभियंता विजय दिगंबर नाळे व
31 वर्षाचा प्रकल्प सल्लागार अभियंता प्रशांत मधुकर जगताप या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
त्यातील तक्रारदाराने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्थसाहयाची मागणी केली होती. ते मंजूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानुसार मंजूर घरकुलाचा उर्वरित रकमेचा धनादेश काढण्यासाठी त्याने विजय नाळे याच्याशी संपर्क साधला. नाळे याने पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तीस हजार रुपयांवर लाच ठरली.
यातील लाच मागितले असल्याने वैतागून गेलेल्या लाभार्थ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यानंतर लाच मागितलेचे निष्पन्न झाले. यातील दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना विजय नाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही लाच घेण्यासाठी प्रशांत जगताप याने देखील लाच मागण्यास प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले व दोघांवर गुन्हा दाखल केला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक शितल जाणवे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक वीरनाथ माने, रियाज शेख, श्री सुरडकर, माने, चालक श्री. जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.











