दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
26 सप्टेंबर रोजी नाश्त्यासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल्स बस मधून लक्ष ठेवून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचे 22 लाख रुपये पळवले पण साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंच्या पोलिसांनी संयुक्त तपास करत मध्य प्रदेश मधील धार येथून आरोपींना ताब्यात घेतले एवढेच नाही तब्बल 18 लाख रुपये हस्तगत देखील केले.
वाई तालुक्यातील गोपेगाव हद्दीतील हॉटेल कोहिनूर येथून 26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते आठ च्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल बस नाश्त्यासाठी थांबली असता नरेंद्र प्रल्हादसिंग ग्रासे हे पुण्यातील व्यापारी या बस मध्ये होते. त्यांच्या बसमधील सीटवर काळ्या रंगाची बॅग ठेवली होती. यामध्ये तब्बल 22 लाख रुपये होते.
दरम्यान त्यांच्याकडे पैसे आहेत याची माहिती घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्यांनी बस मधून ही बॅग चोरली आणि पोबारा केला.
सुवर्णा बिल्डकॉम कंपनीच्या मशीनरी विक्रीतुन आलेले हे २२ लाख रुपये होते . गिरासे यांनी तातडीने भुईंज पोलीस ठाण्यात या संदर्भात चोरीची तक्रार दिली होती त्यावरून अज्ञात आरोपींना विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि ही गंभीर घटना असल्याने पोलीस कामाला लागले.
सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुददेमाल जास्त असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर गुन्हयातील आरोपी हे अज्ञात असल्याने त्यांना निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.
त्याकरीता भुईंज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यांना आरोपी निष्पन्न करणेबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील या गुन्हयाचा समांतर तपास करीत होती. तपास पथकाने गुन्हयाच्या तपासात घटनास्थळाचे परिसरातील, सातारा – पुणे हायवे रोडवरील तसेच आरोपींच्या गुन्हा करुन पळून जाण्याच्या मार्गावरील जवळपास १०० पेक्षा जास्त ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून आरोपी निष्पन्न
केले.
सदरचे आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील धरमपुरी, (जि. धार) येथील राहणारे असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, भुईंज तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सातारा कडील तपास पथकाने कसून तपास करीत ८ ऑक्टोबर २०२३ रोजी गुन्हयातील आरोपी नामे रज्जब हसन खान, (वय – ४१ वर्षे, रा. सिंधीमोहल्ला, धरमपुरी, जि. धार, राज्य मध्यप्रदेश) यास धरमपुरी, मध्य प्रदेश येथुन ताब्यात घेतले .
त्यास भुईंज पोलीस ठाण्यात आणून गुन्हयात अटक केली व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांचे समक्ष हजर केले असता त्यांनी त्याची ११ऑक्टोबर २०२३ रोजी पर्यंत ३ दिवस पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडीच्या मुदतीत आरोपीकडे सखोल तपास करुन चोरीस गेलेल्या रकमेपैकी १८ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात पोलीसांना यश आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बाळासाहेब भालचीम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी केली.
केवळ तांत्रिक तपासाच्या आधारे परराज्यातील
आरोपीला शोधुन त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याचेकडुन रोख रक्कम १८ लाख रुपये हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगीरी केल्याबददल कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी
अभिनंदन केले.











