बारामती : महान्यूज लाईव्ह
महावितरण कंपनीमधील तांत्रिक कामगारांचे मुख्यालय पातळीवर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातील अंमलबजावणी होणे बाकी असलेल्या प्रश्नांसाठी व आवश्यक साहित्यासाठी (मटेरियलसाठी) विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन राज्यात क्रमबद्ध आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस आर.टी. देवकांत यांनी सांगितले.
महावितरणचा लाईन स्टाफ स्वतःचे दुचाकी वाहन कंपनीच्या गतिमान सेवेसाठी मागील अनेक वर्षापासून वापरतो. मात्र त्याला प्रत्यक्ष फिरण्यासाठी जेवढे इंधन मिळणे आवश्यक आहे, ते मिळत नाही. १० वर्षापूर्वी या मागणीला तत्वतः मान्यता दिली तसे लेखी दिले. पुढे २०१८ च्या वेतन करारात ती मागणी समाविष्ट झाली, परंतु महावितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व संचालक बदलले की त्यांची मते बदलतात त्याचाच फटका या निर्णयाची अंमलबजावणी करताना होत असल्याचे ते म्हणाले.
२०२३ ते २०२८ ची वेतनवाढ आली आहे, त्याच्या चर्चा सुरू होतील मात्र वाढीव इंधन भत्ता अद्याप लागू झाला नाही. संघटनेने मागील वर्षी विभागीय कार्यालय ते प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलनं केली. दुचाकी बंद ठेवल्या, मात्र प्रक्रिया सुरू करून पुन्हा प्रस्ताव मागे पुढे तेवढेच काम सुरू आहे. यासोबत .. जाणीवपूर्वक निर्माण केलेली कारागीर ब क ,मीटर टेस्टर १,२,३ आणि प्रधान व वरीष्ठ यंत्रचालक यांची उच्चपदाच्या लाभाची विसंगती दूर करण्याचे मान्य केले, मात्र त्याची अंमलबजावणी बाकी आहे.
कामाचे स्वरूप एकच असल्याने कोणत्याही उपकेंद्रात प्रधान व वरिष्ठ यंत्रचालक यांना पोस्टिंग देण्याबाबत मान्य केले होते, त्याचीही अंमलबजावणी नाही. मार्च २०१९ नंतरची उपकेंद्रे ही खाजगी ठेकेदारांना चालविण्यास दिली आहेत. त्याठिकाणी नियमित कर्मचारी देण्याबाबत मान्यता दिली, एका महिन्यात अंमलबजावणी करण्याचे मान्य केले, त्याचीही अंमलबजावणी अद्याप नाही.
कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महावितरण मागील १० वर्षापासून सहाय्यक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवत आहे. नियमित कर्मचाऱ्यांचे पगारवाढीसोबतच त्यांना मानधन वाढविले जाते. कंपनी नियमित कर्मचाऱ्यांना मागील फरकासह पगारवाढ लागू करते, मात्र सहाय्यकाना कराराच्या तारखेच्या पुढे वाढ लागू करते. म्हणून नियमित कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे मानधन १ एप्रिल २०२३ पासून वाढवावे, यावर १२ मे रोजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्तरावर बैठक झाली, त्यांनी प्रस्ताव सादर करण्यास सूचना दिल्या होत्या.त्यावर कोणतीच कार्यवाही नाही. पदोन्नती सोबत विनंती बदल्या कराव्यात ही मागणी देखील संघटनेने केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे फिल्डवर काम करताना लागणारे आवश्यक मटेरियल, T & P मिळत नाही यामुळे अनेक अडचणी काम करताना येत आहेत असे त्यांनी सांगितले.
या सर्व प्रश्नांसाठी संघटनेमार्फत १० ऑक्टोंबर रोजी सर्व मंडल कार्यालयासमोर निदर्शने करून गेट मीटिंग घेणार आहे. त्यानंतर १७ ऑक्टोंबर रोजी सर्व परिमंडल कार्यालयासमोर निदर्शने करून गेट मीटिंग घेणार आहे व पुढे २६ ऑक्टोंबर पासून सर्व परिमंडल कार्यालयांसमोर बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचे देवकांत यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सचिव कल्याण धुमाळ, बारामती परिमंडळाचे सचिव दत्तात्रय माहूरकर उपस्थित होते.











