बारामती – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील मूळच्या परंतू पुण्यातील नांदेड सिटी येथे राहणाऱ्या निरंजन शहा ३ ऑक्टोबर रोजी आत्महत्येची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाले आहेत, त्यांनी घर सोडले, ते बेपत्ता होणे, ही बातमी त्यांच्या कुटुंबियांसाठी धक्कादायक आहेच, मात्र त्याबरोबरच इंदापूर व बारामती तालुक्यातील शेकडो गुंतवणूकदारांना हादरवणारी ठरली आहे, त्यांनी विश्वासाने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूकीवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.
मूळ इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील निरंजन शहा गायब झाले आहेत. त्यांनी खडकवासला धरण परिसरात त्यांची मोटारगाडी सोडली व त्यामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत शेअर मार्केटमध्ये मी नुकसानीत गेलो असून खूप नुकसान झाले आहे, ज्यांचे पैसे घेतले, ते जवळचे मित्र, नातेवाईक त्यांना मी उत्तर देऊ शकत नाही, मी आत्महत्या करीत आहे, कोणाला जबाबदार धरू नये अशा प्रकारची चिठ्ठी त्या मोटारीतून सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्थात पळसदेवच नाही, तर इंदापूर व बारामती तालुक्यातील शेकडो गुंतवणूकदारांनी ब्रोकर शहा यांनी सांगितल्याप्रमाणे कोट्यवधींची गुंतवणूक केली असून फक्त दीड वर्षात दुप्पट परतावा देण्याची योजना शहा यांनी पसरवली होती व त्याला भुलून अनेकांनी या योजनेत पैसे गुंतवले होते अशी माहिती आता मिळू लागली असून शहा यांनी नुकसानीत गेल्याची चिठ्ठी लिहील्याचे समोर येताच हे सारे गुंतवणूकदार हादरून गेले आहेत. या साऱ्या घटनेत आता आपल्या पैशाचे काय या चिंतेने अनेकांची झोप उडाली असून ज्यांनी सारीच पुंजी या गुंतवणूकीसाठी वापरली, त्यांची चिंता वाढली आहे. आता आपल्या पैशाची सुरक्षितता काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे
दरम्यान सुरवातीला शहा यांच्या सांगण्यानुसार ज्यांनी पैसे गुंतवले, त्यांना दुप्पट परतावा मिळाला, त्यामुळे त्यांनी इतरांना गुंतवणूक करायला लावल्याने अनेकांनी यात गुंतवणूक केली, मात्र आता ते सारेच हादरले आहेत. हा आकडा काही कोटींचा असल्याची दबकी चर्चा असून अगदी एका-एका गुंतवणूकदाराने अर्धा ते पाऊण कोटीपर्यंतची गुंतवणूक केल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे. यासंदर्भात अद्याप कोणीही पोलिसांकडे अथवा प्रत्यक्ष स्वरुपात आपल्या रकमेचा दावा केलेला नाही, मात्र ही दबकी चर्चा आता जोर धरू लागली आहे. शहा हे सुखरूप असावेत अशीच साऱ्यांची अपेक्षा असून ते समोर आल्यास गुंतवणूकीच्या पैशावर उपाय शोधता येतील अशीही चर्चा आता केली जात आहे.











