नगर : महान्यूज लाईव्ह
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो, हे फक्त कवितेतच असतं का? मित्राने मोबाईल मागितला त्याला मोबाईल दिला, थोड्या वेळाने परत आल्यानंतर त्याच मित्राने तू मोबाईल मला दिलाच नाही असं म्हटलं तर? एवढेच नाही, मदत करणाऱ्या मित्राने मोबाईल खिशातून काढून घेतला म्हणून रागारागाने त्याच मित्राला लाथाबुक्याने मारून अडीच हजार रुपये लुटतात का?
अर्थात तसं पाहिलं तर, अशा अनेक गोष्टी आपल्या अवतीभवती अनेकदा घडतात, त्याकडे फारच गांभीर्याने लक्ष दिल जात नाही, पण छोटीशीच घटना मोठ्या गुन्ह्याला आमंत्रण देणारी ठरते आणि हेच नेमकं नगरच्या कोतवाली पोलिसांनी ही छोटीशी गोष्ट सुद्धा कायद्याच्या दृष्टीने किती गंभीर आहे हे दाखवून दिलंय!
अहमदनगरच्या केडगाव येथील सुवर्ण नगर येथे राहणाऱ्या व मजुरी करणाऱ्या 35 वर्षीय मिथुन भीमराव सकट यांना त्यांचा ओळखीचा मित्र आकाश पवार याने 31 ऑगस्ट रोजी चौकात मोबाईल मागितला. सकट यांनी पवार याला मोबाईल दिला. पवार हा मोबाईल घेऊन तिथून गेला आणि थोड्यावेळाने परत आल्यानंतर सकट याने त्याला मोबाईल मागितला.
त्यावेळी त्याने तू मला मोबाईल दिलाच नाही असे वाक्य वापरले. त्यावर मिथुन सकट यांनी पवार याच्या खिशातून स्वतःचा मोबाईल काढून घेतला. प्रकरण तिथेच संपले, पण आकाश पवार च्या बाजूने ते प्रकरण तिथे संपले नव्हते.
त्यानंतर सकट हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना आकाश पवार हा पाठीमागून आला आणि त्याने सकट यांना मारहाण केली तसेच मारहाण करत असतानाच सकट यांच्या खिशातून अडीच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. त्यावरून सकट यांनी कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र आकाश पवार हा फरार झाला होता. मग 5 ऑक्टोबर 2023 रोजी कोतवाली पोलिसांना आकाश पवार हा केडगाव परिसरात फिरत असताना माहिती मिळाली. त्यावरून फौजदार प्रविण पाटील, रविंद्र टकले, दिपक रोहकले, शाहीद, प्रमोद लहारे, सचिन लोडगे व याकुब सैय्यद यांनी तिथे जाऊन सापा रचला व केडगाव बेस येथून त्याला ताब्यात घेतले. गुन्हयाचा पुढील तपास प्रविण पाटील व याकुब सय्यद हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, फौजदार प्रविण पाटील, रविद्र टकले, दिपक रोहकले, शाहीद शेख, प्रमोद लहारे, सचिन लोडगे व याकुव सैय्यद यांनी केली.











