किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील सणसर येथील 36 फाटा या ठिकाणी रात्री बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे . दरम्यान मागील चार दिवसापूर्वी लिमटेक, बारामतीतील शारदानगरला बिबट्या दिसला. लिमटेक मध्ये तर सदृश प्राण्याने सहा शेळ्यावर ताव मारला होता, मात्र या ठिकाणी बिबट्या असल्याचा कोणताही पुरावा वनविभागास मिळाला नाही या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले होते.
दोन वर्षांपूर्वी लाकडी तालुका इंदापूर येथे बिबट्याने दहशत माजवली होती व तो बिबट्या कन्हेरी तालुका बारामती येथे जेरबंद करण्यात आला होता. यानंतर आता दोन वर्षानंतर पुन्हा बिबट्याने कमबॅक केले की काय अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे. सणसर हद्दीतील 36 फाटा येथील मिऱ्याचा माळ परिसरामध्ये सध्या नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू आहे, या ठिकाणी रात्री दोन वाजता नदीजोड प्रकल्पावरील सुरक्षारक्षक ड्युटीवर जात असताना येथील प्रगतशील शेतकरी ऋषीराज निंबाळकर यांच्या पेरूच्या बागेतून बिबट्या डांबरी रस्त्याने पुढे गेल्याचे त्यांना दिसले.
त्यानंतर त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना याची कल्पना दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अभिजीत निंबाळकर सणसरचे माजी सरपंच जयकुमार निंबाळकर, संतोष बिडवे यांनी परिसरात पाहणी केली असता, येथील शेतात चिखलामध्ये प्राण्याचे ठसे आढळले आहेत.
याची खात्री करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी आल्यानंतरच या ठिकाणी असणारा प्राणी बिबट्या आहे की अन्य? या विषयी चित्र स्पष्ट होईल. दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या गळीतास जाणारे ऊस शेतात उभे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आडोसा तयार झाला असून या उसाला पाणी देणे किंवा इतर कामासाठी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.











