विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची पहाटेच पाहणी केली.त्यानंतर बारामतीतील एका खाजगी कार्यक्रमांमध्ये बोलताना त्यांनी खडकवासला धरणातून शिरसाई तलावात पाणी सोडून ते पुढे शिरसाई उपसा सिंचन योजनेद्वारे बारामती तालुक्यातील १४ गावांना मिळावे यासाठी उंडवडी सुपे येथे चक्री उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले.
शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावे यासाठी उंडवडी सुपे येथील श्री.संत तुकाराम महाराज पालखी तळावर शेतकऱ्यांकडून चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे. १०० पेक्षा अधिक शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत.जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिंसेच्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्याचं महात्मा गांधींनी शिकवलेल आहे.प्रत्येकाला आपल्या मागण्यांसाठी उपोषणाचा अधिकार आहे.पण हे करताना आज पाण्याची काय अवस्था आहे.या ठिकाणी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित आहेत. मी खोटं नाही सांगत, मी आज सरकारमध्ये नसतो, तर निरा उजवा आणि डावा कालवा सुटला नसता. थोडसं मी धाडस करतो, हे तुम्हाला गेली ३०-३२ वर्ष माहिती आहे. सुदैवाने देवाच्या कृपेने म्हणा किंवा आणखी कोणाच्या आशीर्वादाने म्हणा, आपण केलेल धाडस कधी वाया गेलेलं नाही. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,वीर धरण ३५ टक्क्यांवर गेल्यापासून कालवे सुरु करण्यात आले आहेत.सध्या भाटघर व निरा देवघर धरण १०० टक्के भरले आहे.गुंजवणी धरण ९५ टक्क्यांवर गेले आहे.परंतु वीरमध्ये ४५ टक्केच पाणी आहे.धरणातून विसर्ग झाल्यावर पाणी पातळी वाढेल.मी पुरंदर उपसा सिंचन योजनेला ४० कोटी तर शिरसाईला २० कोटी रुपये मंजूर करून घेत तेथील पंप बदलण्याचे काम सुरु केले आहे.
वरवंड तलावातून जनाई योजना चालू केली आहे. हवामान खात्याने सांगितले आहे पाऊस पडेल. काही ठिकाणी काल रात्री पाऊस झाला. पण अजून पावसाची नितांत गरज आहे. ओढे,नाले खळखळून वाहिलेले नाहीत. ही सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाचा वर्ष पाण्याच्या दृष्टीने थोडं अडचणीत जातयं की, काय अशी परिस्थिती आहे. हे पाणी एकट्या बारामतीचे नाही. अन्य तालुक्यांचाही विचार करावा लागतो. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.











