इंदापूरात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयात उत्साहात साजरी..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूरच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केली.
विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या शाळा समितीचे सदस्य प्रदीप गारटकर, विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस, डॉ श्रेणिक शहा, डॉ. लहू कदम, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, अशोक मखरे, राजेंद्र चौगुले, बाळासाहेब व्यवहारे, मुख्याध्यापक संजयकुमार शिंगारे ,माजी मुख्याध्यापक भीमराव वणवे, घाडगे, सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव जाधव, छाया जाधव, पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील जाधव, रेश्मा शेख तसेच अनेक माजी विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी झांज पथक, लेझीम पथक, टिपरी नृत्य इत्यादी कलाप्रकार सादर करत वाजत गाजत विद्यालयातून रामवेस -पोरापोरांची चावडी – आंबेडकर नगर- कासारपट्टा- नेहरू चौक- खडकपुरा- नगरपालिका- ४० फुटी रोड- दर्गा मज्जित चौक- संभाजी चौक या मार्गे मिरवणूक काढण्यात आली.
विविध ठिकाणी माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या वतीने कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी घोषणांनी परिसर दणाणला.अनेकांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट गोळ्या वाटप केले. धनंजय वाशिंबेकर मेमोरेबल ट्रस्टच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शिस्तबद्ध व शांततेत ही मिरवणूक झाली.











