सोलापूर : महान्यूज लाईव्ह
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना अत्यंत खालच्या पद्धतीने भाषा वापरली. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तरादाखल भैया चौकात सोलापूर येथे डुकराची पिल्ले आणून त्यांचं नामकरण केलं. राष्ट्रवादीचे सुहास कदम यांनी पडळकर यांना इशारा देताना, अजित पवार सध्या भाजप सोबत राज्यात सत्तेत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मात्र बेताल वक्तव्य करत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर असेच बेताल वक्तव्य करत राहिले, तर राष्ट्रवादी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान सोलापुरातील अमित सूरवसे आणि इतर एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
भाजपने जसं अनेकांना फसवलं, तसं धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगून देखील फसवलं अशी टीका सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर केली होती. त्यावर गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबातील सदस्यांवर खालच्या पातळीवर टीका केली. गोपीचंद पडळकर म्हणाले, अजित पवार हे लांडग्याचे पिल्लू आहे. धनगर समाजाबद्दल त्यांचे भावना चांगली नाही, तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक असून धनगर समाजाने आतापर्यंत तुमच्या पालख्या उचलल्या. लोकांच्या चपल्या फाटल्या, तरीही तुमच्या बापाने, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडे पाहिलं नाही. त्यामुळे तुम्हाला आता धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आरक्षणावर काम करत आहेत. दोन महिन्यात आरक्षण प्रकरणी निकाल होईल अशा स्वरूपाची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.











