बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती आणि परिसराचे शिक्षण विश्व ज्यांच्या अनमोल योगदानामुळे उजळून निघाले अशा इंग्रजी विषयाचे ख्यातनाम प्राध्यापक डॉ. के. एस. अय्यर यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने नुकतीच एक दिवसीय इंग्रजी संवाद कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले. कार्यशाळेत प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शशांक माने आणि इंदापूर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. धनंजय भोसले, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे आणि डॉ. श्रीराम गडकर उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी प्रा. डॉ. अय्यर यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे सर्वांना प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार काढले. त्यांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी घेऊन आमचा इंग्रजी विभाग मार्गक्रमण करत आहे असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.
प्रा. डॉ. शशांक माने यांनी प्रा. अय्यर सर यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडून दाखविले आणि त्यांच्या महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून दिला. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंग्रजी संवाद कौशल्ये कशी आत्मसात करून घ्यावी याचे प्रात्यक्षिक दाखवून इंग्रजीतील अनेक घटक प्रत्यक्ष सोडवून घेतले. त्यांच्या या तंत्रसुलभ व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले आणि त्यांची इंग्रजी विषयाची गोडी लागावी म्हणून विशेष प्रयत्न केले.
प्रा. धनंजय भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, इंग्रजी ही फक्त रोजगाराची भाषा नसून ती ज्ञानाची आणि मानवी उत्थानाची भाषा आहे. याच भाषेमुळे आपल्या देशातील भाषिक सीमा पुसट होत आहेत. इंग्रजी ही आता जनसामान्यांची भारतीय भाषा म्हणून नावारूपाला येत आहे. तसेच प्रा. अय्यर यांच्या अस्खलित इंग्रजीमुळे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पोहोचले आहेत याचाही आढावा त्यांनी घेतला.
या कार्यशाळेची प्रस्तावना इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय खिलारे यांनी केली. अतिथींचा परिचय प्रा. नीलेश पांढरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राजकुमार कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि प्रा. दादासाहेब मगर यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. शामराव घाडगे आणि डॉ. लालासाहेब काशिद यांनी विशेष परिश्रम घेतले.











