रामभाऊ जगताप : महान्यूज लाईव्ह
चांदा चौकडीच्या करामती ही मराठीतली मनोरंजनाची वेब सिरीज सुरु होऊन आता तीन वर्षापेक्षा जास्त दिवस उलटले. महाराष्ट्रातच नाही, तर सातसमुद्रापार मराठी रसिकांनी डोक्यावर घेतलेली ही वेब सिरीज मनामनात आहे. दर आठवड्याला रविवारी सकाळी सर्वांना प्रतीक्षा असते, ती नव्या एपिसोडची आणि यातील कलाकारांच्या अभिनयाची!
काल परवा मात्र एक गंमत झाली. चांडाळ चौकडीच्या करामतीतले बाळासाहेब उर्फ भरत शिंदे हे दारुड्या व्यक्तीचा अभिनय करतात. तो इतका बेमालून असतो की, ते स्वतः माळकरी आहेत, व्यसनमुक्त आहेत, निर्व्यसनी आहेत, याचा विसरच लोकांना पडतो. त्यामुळे अनेक गमतीजमतीच्या प्रसंगांना सामोरे जावं लागतं.
परवा केज तालुक्यातील एका गावात बाळासाहेब उर्फ भरत शिंदे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे कीर्तन या ठिकाणी होणार आणि त्यासाठी प्रचंड मोठी गर्दी होणार हे गृहीत धरून गावकऱ्यांनी हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गावातील नियमितपणे दारू पिणाऱ्यांना एक फर्मान काढले. कीर्तन होईपर्यंत त्यांनी गावाच्या बाहेर थांबावे किंवा किर्तनाच्या ठिकाणाकडे अजिबात फिरू नये असे गावकऱ्यांनी सांगितले.
अर्थात गावातील व परिसरातील दारू पिणाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्याला बाळासाहेबांचा सत्कार करायचा आहे, त्यांनी आपल्याला प्रतिष्ठा मिळवून दिली असा काहीतरी नवीन जावईशोध लावला, पण गावकऱ्यांनी त्यांना फर्मान काढल्यामुळे त्यांचा मोठा हिरमोड झाला. मग त्यांनी त्यावर एक आयडिया काढली. गावापासून काही अंतरावर घाटरस्ता आहे. भरत शिंदे यांची गाडी केव्हा येते याची वाट पाहत 50 ते 75 जण या घाटावरच थांबले.
याच ठिकाणी त्यांनी जंगी स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला. बाळासाहेब त्यांच्या किया या वाहनातून येत असल्याचे दिसताच या दारुड्यांनी जल्लोष केला आणि गाडी थांबवायला भाग पाडले. यानंतर येथे फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली, तसेच पुष्पहार घालून बाळासाहेब उर्फ भरत शिंदे यांचे धुमधडाक्यात स्वागत केले. काही क्षण भरत शिंदे यांना काही कळलेच नाही, पण जेव्हा त्यांना लक्षात आले की हे सर्व दारू पिणारी माणसं आहेत आणि ते आपल्या स्वागतासाठी जमलेत हे लक्षात येताच त्यांनाही घाम फुटला.











