स्वतःच्या जिभेवरती नियंत्रण ठेवा.. हर्षवर्धन पाटलांची जाहीर माफी मागा.. नाहीतर जशास तसे उत्तर देणार, बाबामहाराज खारतोडे म्हणाले!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी एका कार्यक्रमात भाषणामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे हर्षवर्धन पाटील समर्थक घायाळ झाले आहेत. इंदापूर तालुका भाजपा प्रवक्ते बाबामहाराज खारतोडे यांनी कोकाटेंवर शरसंधान साधले.
खारतोडे यांनी कोकाटेंना हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत एकेरी उल्लेख करत बेताल वक्तव्य बंद करण्याचा सल्ला दिला आहे. स्वतःच्या जिभेवरती नियंत्रण ठेवा.. हर्षवर्धन पाटील व समस्त तालुक्याची जाहीर माफी मागा, अन्यथा जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा खारतोडे यांनी दिला आहे.
बाबामहाराज खारतोडे म्हणाले की, कामगारांचे संसार उध्वस्त केले म्हणुन पायाला दुखापत झाली,अशी टीका आमचे नेते, विकासरत्न हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली गेली. अरे त्यांना सांगा, तालुक्यात संस्था उभारुन कामगारांच्या हाताला काम दिले. त्याच पायांनी आणि सक्षम खांद्यांनी कामगारांच्या संसाराचा भार वाहिला. कोणाला दुखापत झाली तर लोक हळहळतात ते माणुसकी व समाजकारण म्हणून. दुखापत झालेली व्यक्ती बरी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करणे ही जनरित आहे, पण त्या दुःखावरीची खपली काढुन मीठ चोळणारी माणसं समाजात व राजकारणात आहेत हे दुर्भाग्य आहे .
सहनशीलतेपलिकडे टिका टिप्पणी झाली, तरी वैचारीक पातळी सोडुन आम्ही कधीही वैयक्तीक टिका केली नाही, कोणाच्या दुःखावर मीठ चोळले नाही. वैचारीक अधिष्ठान नसतानाही अपेक्षेपेक्षा मोठं राजकीय पद मिळालं की, बोलताना असा तोल जाणारंच, असे देखील बाबामहाराज खारतोडे म्हणाले.
हर्षवर्धन पाटील मंत्री असताना रेल्वेने मुंबई प्रवास करत होते, त्याचवेळी इंदापूरचे माजी आमदार कै.गणपतराव पाटील देखील त्याच रेल्वेने प्रवास करत होते. त्यावेळेस अचानक गणपतराव पाटील यांच्या पोटामध्ये वेदना होऊ लागल्या, हे कळताच हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून स्वतः गणपतराव पाटील यांना दवाखान्यात ॲडमिट केले व सर्व यंत्रणा हलवली.
हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या या संवेदनशील कृतीतून दाखवून दिलं की, राजकारण हे राजकारणापुरतच केलं पाहिजे. परंतु आत्ताच्या कृतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष जे बेताल वक्तव्य करत आहेत, हे इंदापूरच्या किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही. राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांनी जर हर्षवर्धन पाटील व समस्त तालुक्याची जर जाहीर माफी मागितली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय व जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा खारतोडे यांनी दिला आहे.











