सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. भांडगाव येथील माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यातील दौरे अतिशय कमी झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सुळे यांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झाले. असे असताना खा.सुळे या एकाकी पडल्याची चर्चा झडत असताना मध्यंतरी दौंड तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात नेत्यांनी जरी सुळे यांच्या कार्यक्रमाला पाठ फिरवली होती तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दाखवली होती.खा. सुळे यांचा आमदार दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर यांच्या बरोबर कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यात धडाका सुरू होता.मात्र फुटीनंतर त्याला आता ब्रेक लागला आहे.खा.सुळे या पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत.
आज सोमवारी भांडगाव येथील माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या खो-खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यात येत असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, महिला अध्यक्ष छाया पडसळकर, युवा नेते शशिकांत तरंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, क्रीडा अधिकारी इंदापूर महेश चावले, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद झोळ उपस्थित राहणार आहेत.











