दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यात मोटर सायकल चोरणाऱ्या सराईत टोळीतील एका मोहरक्याला यवत पोलीसांनी जेरबंद केले आहे. यवत, जेजुरी, लोणी काळभोर, हडपसर, लोणीकंद परिसरातील तब्बल १३ मोटारसायकल ची चोरी केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पवन चट्टान राठोड (वय २७ रा.म्हातोबाची आळंदी ता.हवेली जि.पुणे) असे या दुचाकीचोराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ३ ते ४ जुलै २०२३ दरम्यान यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव येथील तुषार अशोक ताकवणे यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत पारगाव ते सुपा रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले. त्यात एकावर चोरीचा संशय बळावला आणि यवत गुन्हे शोध पथकाने सहजपुर फाटा येथून संशयित म्हणून पवन चट्टान राठोड यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता पवन राठोड याने त्याचे इतर साथीदार कार्तिक अविनाश राठोड (रा. जेजुरी ता. पुरंदर जि. पुणे), भीष्म संतोष राठोड (रा. जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे ) यांच्या मदतीने यवत, जेजुरी, लोणी काळभोर, हडपसर, लोणीकंद हद्दीतून १३ मोटार सायकली चोरल्या असल्याचे तपासात समोर आले आहे.
यवत, जेजुरी, लोणी काळभोर, लोणीकंद, हडपसर या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी पवन चट्टान राठोड याला ताब्यात घेत १३ मोटार सायकली असा एकूण किंमत रुपये ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर त्याचे इतर दोन साथीदार फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कदम,
गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप,पोलीस नाईक विकास कापरे, विशाल जाधव, पोलीस शिपाई मारुती बाराते, भारत भोसले, सुनील कोळी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. यवत पोलीसांच्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.











