बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील तावरे आणि उपाध्यक्ष सागर जाधव यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब तावरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले असून, तब्बल 18 वर्ष अध्यक्षपदावर व कारखान्यावर संधी दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. दरम्यान आताच कारखान्याचे नवे अध्यक्ष कोण? याची चर्चा आजपासून सुरू झाली आहे.
चार दिवसापूर्वीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने जिल्ह्यातील सर्वाधिक 3411 रुपये प्रतिटनी ऊसाचा दर जाहीर करत जिल्ह्यात आघाडी घेतली होती आणि त्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात रंगली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा माळेगाव जिल्ह्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
कारखान्यावर असलेली भाजपची सत्ता दूर करत साडेतीन वर्षांपूर्वी माळेगाव वर राष्ट्रवादीची सत्ता आली आणि बाळासाहेब तावरे कारखान्याचे अध्यक्ष बनले. आजवर संचालकांच्या मदतीने काम केले असले, तरी वयोमानानुसार आपली तब्येत साथ देत नाही, असे कारण त्यांनी दिले असून ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अधिक सक्षम करण्यावर आपण भर दिला असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आता माळेगावचे नवे कारभारी कोण याची चर्चा आजपासूनच रंगली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आता नेमके कोण असणार याची चर्चा आजपासूनच सुरू झाली आहे.











