राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : जालना जिल्ह्यातील अंरतवली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद दौंड तालुक्यात तिसऱ्या दिवशीही पहायला मिळाले. तालुक्याच्या पूर्व भागात खडकी, मलठण, राजेगाव, खानोटा, लिंगाळी, गोपाळवाडी आदी गावांमध्ये निषेध मोर्चा, निषेध सभा व गाव बंद ठेवून आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहकाऱ्यांसह सुरू केलेले उपोषण आणि या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज आणि त्यानंतर राज्यात पेटलेले सकल मराठा समाजाचे आंदोलन यामुळे मोठ्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात ही या आंदोलनाची धग पोहचली.

दौंड तालुक्यात सरकारच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू असल्याचे चित्र होते. दोन दिवसांपूर्वी दौंड शहरासह तालुक्यातील पश्चिम भागात या आंदोलनाचे पडसाद उमटले होते. सोमवारी ( दि ४ ) तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

दौंड – कुरकुंभ रस्त्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने बोरावकेनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मलठण येथे मराठा समाजाच्या वतीने दौंड – राजेगाव रस्त्यावर टायर पेटवून आणि गाव बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. राजेगाव व खानोटा येथे निषेध सभा घेऊन गावातील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला.

पुणे सोलापूर महामार्गावरील खडकी येथे निषेध मोर्चा काढून राज्य सरकारचा व पोलिसांनी केलेल्या लाठीहल्याचा निषेध नोंदवण्यात आला. तर कानगाव येथे मराठा समाजाच्या वतीने अंगावरील कपडे जाळून अर्धनग्न होत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेतली. दौंड तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत व मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध सुरू आहे.
या आंदोलनात विविध राजकीय पक्षाचे व मराठा संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दौंड, यवत व पाटस पोलिसांनी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये व या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस प्रशासन दक्षता घेत असून या आंदोलनावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.











