इंदापूर तालुक्यातील बेडशिंगे येथील घटना
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
माणसाचा आयुष्य एक कवडीमोल झाला आहे आणि राग इतका वाढत चालला आहे की.. अगदी क्षुल्लक कारणावरून दुसऱ्याचा जीव घ्यायला सुद्धा लोक मागे पुढे बघेनात. इंदापूर तालुक्यात परराज्यातील शेतमजूर काम करतात एकाच गावातील असूनही केवळ जेवण कोणी बनवायचे यावरून दोघात वाद झाला आणि एकाने अजिबात विचार न करता दुसऱ्याचा जीव घेतला.
इंदापूर तालुक्यातील बेडशिंगे येथे ही घटना घडली. केवळ जेवण कोणी बनवायचे यावरून झालेल्या वादातून जर एकमेकांचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नसतील, तर हे शेतमजूर दहशतवाद्यांपेक्षाही अधिक क्रूर आहेत, त्यांना कामावर ठेवावे का? असाच समज या निमित्ताने होऊन परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेतील आरोपी आणि ज्याचा मृत्यू झाला, ते दोन्ही शेतमजूर हे उत्तर प्रदेशातील इलाहाबाद जिल्ह्यातील आहेत. या घटनेत शुभम लालजी भारतीय या 35 वर्षीय शेतमजूराचा खून झाला, तर आरोपी नीरजकुमार लालमणी कुशवाह हा देखील त्याच गावचा रहिवाशी आहे. नीरजकुमारला इंदापूर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.
या संदर्भात इंदापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की इंदापूर तालुक्यातील बेडशिंगे येथील मिलिंद जोशी यांची शेतजमीन निलेश जांभळकर या कर्जत तालुक्यातील राशीन येथील शेतकऱ्याकडे कसण्यासाठी आहे. या ठिकाणी जांभळकर यांनी उत्तर प्रदेशातील मजूर कामावरती ठेवलेले होते. त्यामध्येच शुभम आणि निलेश कुमार या दोघांचा समावेश होता.
शनिवारी एकत्र जेवण बनवण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढू लागताच जांभळकर यांनी मध्यस्थी केली आणि त्यांच्या दोघांचा वाद मिटवला. शनिवारी दुपारी हा वाद मिटवल्यानंतर संध्याकाळी हे दोघे गावातील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले, तेथे असलेल्या महाप्रसादाचाही आस्वाद दोघांनी घेतला आणि त्यानंतर घरी परतले.
मात्र रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला, तेव्हा जांभळकर तिकडे पोचले, तेव्हा नीरजकुमार कोयत्याने शुभम याच्यावरती वार करत होता. यात शुभम हा गंभीर जखमी झाला. जांभळकर यांनी तातडीने त्याला दवाखान्यात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी तातडीने नीरजकुमार कुशवाह याला ताब्यात घेतले व अटक केली.











