राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथील नेमचंद गांधी या ज्येष्ठ नागरिकाचा वनविभागाच्या हद्दीत नेऊन गळा दाबून खून केल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हे प्रकरण कोणाला न सांगण्यासाठी मला १५ लाख रुपये रोख द्या, अशी मागणी वरवंड येथे राहणारा व पुणे पोलीस दलात पोलीस असलेल्या पोलिसांनी मागितल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यामुळे गांधी यांच्या खून प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.
सागर गोविंद शिंदे (रा.वरवंड ) असे या आरोपीचे नाव असून हा पुणे शहर पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई आहे. वरवंड येथे वहिनीचे वडील नेमचंद गांधी यांचा २७ मार्च २०२२ रोजी राकेश भंडारी, प्रणय राजेंद्र भंडारी, विजय राजाराम मंडले , अतुल अशोक जगताप यांनी वन विभागाच्या हद्दीत नेऊन गळा दाबून खून केल्याची घटना घडली होती.
मात्र या आरोपींनी गांधी हे घरात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र एका कथित व्हिडिओमुळे त्यांनी एक वर्षांपूर्वी केलेल्या या खुनाचे भिंग फुटले. सध्या हे आरोपी येरवडा कारागृहात असून आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात हा कथित व्हिडिओ माझ्याकडे असल्याचे बतावणी करत १५ लाखांच्या मागणीसाठी एक पोलीस ब्लॅकमेल करीत असल्याचे आता समोर आले आहे.
या प्रकरणी राहुल चयनलाल भंडारी (वय ४४, व्यवसाय पेपर एजन्सी रा. वरवंड, शिवाजी चीक ता. दौंड जि. पुणे) यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने सागर शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सागर शिंदे हा २४ जुलै २०२३ रोजी आरोपी राकेश भंडारी याच्या घरी येऊन आपले जे ठरले आहे, त्याप्रमाणे तु मला लगेच पंधरा लाख रुपये रोख दे. मात्र हे एवढे पैसे हा कशासाठी मागत आहे? असे राहुल याने भावाला विचारले, मात्र त्याने सांगण्यास टाळाटाळ केली व काही वेळात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखंड येथे जावुन त्याच्या नावावर असलेली ९ लाख रुपयांची एफ. डी. मोडुन पैसे घेवुन घरी आला.
तेव्हा पुन्हा त्याला विचारले की, मला खरे सांग, काय प्रकार आहे? एवढे पैसे तु कशासाठी काढले आहेत व सागर शिंदे तुला कशाचे पैसे मागत आहे? असे विचारल्यावर राकेशने सांगितले की, “तुझे सासरे नेमीचंद गांधी यांचा खून केला. या घटनेचा व्हीडीओ माझ्याकडे असल्याचे सांगत मला बॅकमेल करत आहे. मी त्यास पैसे दिले नाही, तर माझ्यासह आपल्या घरातील सर्वांना खुनाच्या गुन्हयांमध्ये अडकवील अशी धमकी देत आहे. त्यामुळे त्याला १५ लाख रुपये देयचे आहे माझ्याकडे एवढे पैसे नसल्याने त्याला आठ लाख देण्याचे मी मान्य केले आहे. “असे राकेशने भाऊ राहुल याला सांगितले.
त्यामुळे भंडारी कुटुंबियांनी घाबरून सागर शिंदे यास गावातील गोपीनाथ मंदीराचे समोर ८ लाख रुपये रोख खंडणी स्वरूपात दिले. दिलेल्या पैश्याबदल कोणाला काही एक सांगितले तर तुम्हाला खुनाच्या गुन्हयामध्ये गुंतवील अशी धमकी देत तेथुन निघुन गेला.
अशी फिर्याद राहुल भंडारी यांनी यवत पोलीस ठाण्यात दिल्याने सागर शिंदे याच्यावर खंडणीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत. दरम्यान, सागर शिंदे हा पोलीस कर्मचारी असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.











