सासवड : महान्यूज लाईव्ह
कामातुरानां न भयं न लज्जां.. हे संस्कृत सुभाषित जुन्या काळात उगीच लिहिलेले नाही.. कारण त्याचे प्रत्येक जागोजागी येताना दिसतात.. आता चार वर्षाच्या मुलाला आपल्या आईचे विवाहबाह्य संबंध आहेत हे कसं कळेल? पण प्रेमाच्या बंधनात जगाचा विसर पडलेल्या आईने आणि प्रियकराने चार वर्षाच्या पुढच्या मुलाचा गळा घोटायला मागे पुढे पाहिले नाही. हे नराधम फक्त तेवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी त्या बिचार्या मुलाला मारून त्याचा मृतदेह भुलेश्वरच्या घाटात फेकून दिला.
दीड महिन्यापूर्वीची ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी आई व तिच्या प्रियकराला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. ही आई रेणू शंकर पवार (वय 20) व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके (वय 21, दोघेही रा. मोडनिंब ता. माढा जि सोलापूर) या दोघांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात मात्र चुटक्या शंकर पवार या चार वर्षीय मुलाचा हकनाक जीव गेला.
मोडनिंब (ता माढा जि सोलापूर) येथे राहणाऱ्या रेणू आणि तिचा प्रियकर उमेश या दोघांनी प्रेमात अडथळा ठरतो, म्हणून ४ वर्षाच्या चुटक्याला बरोबर घेऊन गळा दाबून खून केला व त्याचे प्रेत साडीमध्ये गुंडाळून पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील भुलेश्वर घाटात फेकून दिले.
रेणू हिच्या चुलत बहीणीने हा प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे जेजुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे तपास करीत आहेत.











