पिंपरी : महान्यूज लाईव्ह
गेल्या एका महिन्यात मुळशी, निरा देवघर धरणातील घटनांसह इतरही दोन घटना घडूनही अजूनही वर्षाविहाराचा आनंद काही कमी होत नाही. काळजी घेण्याची कितीही आवाहने केली, तरी धोके मात्र लक्षात येईनात.
काल देखील पिंपरी चिंचवड मधील कुंडमळा येथे कॉलेजला दांडी मारून फिरायला गेलेल्या नऊ विद्यार्थ्यांपैकी चार जण पाण्यात उतरले. दोघा जणांचा जीव गेला! हा या महिन्यातील पुणे जिल्ह्यातील नववा बळी आहे!
पिंपरी चिंचवड मधील शेलारवाडी नजीकच्या इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा परिसरात हे विद्यार्थी फिरण्यासाठी गेले होते. गुरुवारी सकाळी या कुंडमळ्यात उतरलेल्या अनिकेत वर्मा या सतरा वर्षीय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर आणखी एक जण पाण्यात वाहून गेला.
अनिकेत वर्माचा मृतदेह आढळला असून, दुसऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. हे दोघेही चिंचवड येथील श्रीमती गेंदेबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी होते. एकूण आठ ते नऊ जण पावसाळ्यातील आनंद घेण्यासाठी बेगडेवाडी येथे उतरले. ते चालत चालत कुंडमळा येथे पोहोचले, मात्र दोघा जणांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते वाहून गेले. अनिकेत वर्माचा मृतदेह सापडला, मात्र अद्याप दुसरा एक जण बेपत्ता आहे.











