महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत वाद सुरूच आहे. या वादात मनसेने भुमिका न घेतल्याने शिवसेनेचे मुखपत्र सामनातील रोखठोक सदरातून खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
सामनामध्ये राऊत यांनी रोखठोक सदरात लिहीले आहे की, ‘ठाकरे ‘ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रॅण्ड पवार या नावाने चालतो. मुंबईतून या ब्रॅण्डलाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे.
राज ठाकरे हे सुद्धा त्याच ब्रॅण्डचे एक घटक आहेत.व या सगळ्याचा फटका त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल अशी चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली.
मुंबईला पाकिस्तान व महापालिकेस बाबरची सेना असे बोलणार्यांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय राजपूत, क्षत्रिय मते मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल.
धोरण राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्यांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणुन दिल्लीतील एकाही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही, तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लागवला.










