घरोघरी रॅपीड अंन्टिजेन तपासणी पूर्ण
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे आज घरोघरी रॅपिड अंन्टिजेन कोरोना तपासणी करण्यात आली. पाटस मधील 3 हजार 439 कुटुंबाची व लोकसंख्ये प्रमाणे तब्बल 13 हजार 18 जणांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी डॅा.सुरेखा पोळ यांनी याबाबत माहिती दिली. दौंड तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील सर्व कोवीड सेंटर रूग्णांनी भरले आहेत. अनेक कोरोना बाधीत
रूग्णांना घरीच उपचार करावे लागत असल्याने अनेक गावांमध्ये कुटूंबातील सर्वजण कोरोनाबाधीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक जण स्वतःहून रूग्णालयात तपासणी येत नाहीत यामुळे दौंड प्रशासनाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार पहिल्या टप्पात आज शनिवारी (ता. 12 ) पाटस गाव व वाड्यावस्त्यांमध्ये 72 पथके करून घरोघरी जाऊन कुटूंबांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये पाटस मधील एकुण 3 हजार 439 कुटुंबाची व लोकसंख्ये प्रमाणे तब्बल 13 हजार 18 जणांची कोरोनाची रॅपीड अंन्टिजेन व प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
यामध्ये नागरीकांना सहव्याधी (उदा.बीपी,मधुमेह,किडणी आजार व इतर व्याधी ) आहे का, सर्वसाधारण खोकला, थकवा आहे का, डोकेदुखी आहे का, घशात खवखव आहे का किंवा घसा दुखत आहे का, सर्दी व खोकला आहे का, श्वास घेण्यास त्रास, उलटी, जुलाब, चव ओळखण्याचा त्रास आदी लक्षणे याबाबतची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तसेच त्यांची शरीरातील तपमान व अॅक्सिजनची मशीनद्वारे तपासणी करण्यात आली.
41 जणांची कोरोनाची रॅपीड अंन्टिजेन तपासणी करण्यात आली, यामध्ये 5 जणांचा तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यापुढेही अशा प्रकारे तपासणी सुरू ठेवण्यात येणार आहे. पाटस परिसरातील तपासणीसाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, दौंड पंचायत समिती विभाग, आशा,अंगवाडी कार्यकर्त्यां यांच्यासह सुमारे तीनशे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पाटस कोवीड सेंटरला भेट देवून सुरू असलेल्या तपासणी कामाची माहिती यावेळी घेतली. दौंड पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, प्रभारी तहसीलदार हनुमंत म्हेत्रे, नायब तहसीलदार सचिन आखाडे, प्रभारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमितकुमार माने, तालुका आरोग्य अधिकारी डॅा.सुरेखा पोळ, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, पंचायत समितीच्या सभापती आशा शितोळे, डॅा.शिवराणी पांचाळ, डॅा.तुकाराम बनसोडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, दौंड पुरंदरचे प्रांतधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सांगितले की, पहिल्या टप्पात दौंड शहरासह तालुक्यातील सात कोरोनाबाधीत गावांमध्ये अशा प्रकारे घरोघरी तपासणी केली जाणार आहे. पाटस येथील कोवीड सेंटरमध्ये कोरोना तपासणीसह सुर्व सुविधा पुरविण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोरोनाची साखळी तोडणे हा मुख्य उद्देश असून नागरीकांनी त्रास होत असेल तर स्वत:हून पुढे येवून आरोग्य विभागाची त्वरीत संपर्क साधावा.











