दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या बसस्थानकावर वाई सातारा सुपर विनाथांबा बसमध्ये चढताना अज्ञाताने महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी २१ जुलै रोजी दुपारी दिड वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे आयपीएस परिविक्षाधीन अधिकारी असलेले कमलेश मीना यांना समजताच त्यांनी तातडीने महिला सहाय्यक फौजदार एस. एस. मुजावर, महिला हवालदार एस. वाय. शिरतोडे, प्रेम शिर्के, होमगार्ड इंद्रजित लाखे, सुरज शिंदे, श्रीधर घाडगे यांचे तपास पथक तयार करुन वाईच्या एसटी स्टँडवर पाठवले.
हे पोलिस पथक बसस्थानकात दाखल झाले , तेव्हा तेथे अंजना श्रीरंग फणसे (वय ६० राहणार दसवडी ता.वाई) या सातारा येथे दवाखान्यात जाण्यासाठी वाईच्या एसटी स्टँडवर येऊन त्या वाई सातारा सुपर विनावाहक या एसटीत गर्दीमध्ये चढत असतानाच अज्ञात चोरट्याने या गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे दागिने लंपास केले असल्याची माहिती त्यांनी पोलिस पथकाला दिली.
या पथकाने तातडीने बसस्थानक परिसरात असणारे सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता दुर्दैवाने ज्या ठिकाणी वाई सातारा जलद गाडी लागते त्या ठिकाणापर्यंत बसविलेल्या सीसीटिव्ही कॅमेरेची नजर पोहचत नसल्याने तपास पथक हतबल झाले, तोपर्यंत चोरटा लंपास झाला. त्यामुळे वाई आगार प्रमुखांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे अशी मागणी प्रवाशांसह पोलिस प्रशासनाकडून होत आहे .