भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
संपलेल्या गळीत हंगामाच्या काळातील पुरवठा केलेल्या उसासाठी अद्याप पर्यंत एफ आर पी तील 112 रुपये प्रतिटन रक्कम राहिलेली आहे, ती रक्कम अधिक तीनशे रुपये प्रतिटनी आणि थकलेल्या रकमेवरील व्याज मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज छत्रपती कारखान्यावर आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन भवानीनगर येथील छत्रपती कारखान्यावर केले.
यावेळी कदम म्हणाले, सध्या उसाच्या लागवडी सुरू आहेत आणि शेतकऱ्यांकडे पैसा नाही. पाऊस नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत आणि मागील वर्षी गाळप केलेल्या ऊसाचे उर्वरित पैसे अजून मिळाले नाहीत. इतर कारखान्यांच्या तुलनेत छत्रपती कारखान्याकडे अगोदरच उसाचा दर कमी आहे आणि त्यात पुन्हा शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम दिली जात नाही.
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पवित्र घेतला असून जोपर्यंत उसाची थकीत रक्कम अधिक तीनशे रुपये प्रतिटनी अंतिम दर दिला जात नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन स्थळावरून उठणार नाहीत असा पवित्रा अमरसिंह कदम यांनी जाहीर केला. यावेळी वालचंदनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.