इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील हाॅट स्पाॅट असणा-या गावांची सोमवारपासून घरोघरी सर्वेक्षण करून कोरोना नियंत्रणासाठी उपाय योजना आखली जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज इंदापूर शहरातील ३० हजार लोकांच्या कोरोना सर्वेक्षणाची सुरुवात झाली. या सुरुवातीच्या उपक्रमात स्वतः भरणे हे देखील सहभागी झाले होते.
इंदापूर शहरामध्ये ३० हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण शहरामधील १०६ जणांच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सुरू केले. याची माहिती भरणे यांनी घेतली, भरणे यांनी स्वतः काही कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला तसेच त्यांचे कुटुंबातील सदस्यांचे थर्मल स्क्रिनिंग स्वतः केले.
याचा व्हिडीओ येथे पहा, अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा अंकिता शहा, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, आरोग्य विभागाचे डॉ एकनाथ चंदनशिवे, नगरसेवक पोपट शिंदे, अमर गाडे, अशोक मखरे, दादा सोनवणे, राहुल गुंडेकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
शहरात प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याची थर्मोमिटरने ताप व पल्स ऑक्सिमिटरने ऑक्सिजन सॅच्युरेशनची तपासणी केली जात आहे. तसेच कुटुंबातील लोकांना कोणत्या प्रकारचे आजार आहेत त्याची माहिती घेतली जात असून त्यानुसार संशयितांना कोविड सेंटर येथे नेऊन त्यांची कोरोना रॅपिड टेस्ट केली जाणार आहे.
यामुळे विनालक्षणाचे कोरोना रूग्णांचे निदान तात्काळ होऊन त्यांच्यावरती वेळेवर उपचार होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.
आज भरणे यांनी स्वतः या अभियानात सहभागी होऊन लोकांशी संवाद साधला. प्रत्येकाने आपल्यासहीत आपल्या कुटुंबीयांची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी श्री भरणे यांनी केले.











