बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा (2005-2007) माजी विद्यार्थी सचिन सर्जेराव खिलारी याने पॅरिस येथे संपन्न झालेल्या (पॅराऑलिम्पिक) पॅरा ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप या स्पर्धेत नवीन जागतिक विक्रम करत गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावले व त्याने स्वतःच्या नावावर आशियाचा विक्रम ही नोंदवला.
गोळाफेकीत भारताचे प्रतिनिधित्व करत त्याने एक नवा इतिहास रचला. त्याने सुवर्णपदक तर जिंकलेच, परंतु या प्रकारात त्याने 16.21 मीटर अंतरावर गोळा फेकून स्वतःच्या नावावर एक आशियन विक्रमही नोंदवला. त्याच्या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानने देखील त्याचे कौतुक केले असून त्याची पूर्वीचे क्रीडा शिक्षक लक्ष्मण मेटकरी व सचिन खिलारी यांचे महाविद्यालयाच्या व विद्या प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन खिलारी याने पॅरिस येथे शुक्रवारी पॅरा अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पुढील वर्षीच्या पॅरालिम्पिकसाठी भारताचा कोटा मिळवला.
या स्पर्धेत अमेरिकेच्या जोशुआ सिनामोने रौप्यपदक पटकावले, त्याने 16 मीटर तर दक्षिण आफ्रिकेच्या केर्विन नोएम्डोने 15.30 मीटर अंतरावर गोळा फेक करून कांस्यपदक जिंकले.