दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी पालघरहून आलेल्या पर्यटकांची बस उभी करण्याच्या कारणावरून स्थानिक मुलांनी केलेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि झोपडपट्टीतून आलेल्या जमावाने थेट बसवर हल्ला चढवला. यात बसच्या काचा फुटल्या आणि तीन पर्यटक गंभीर जखमी झाले.
याबाबतची विस्तृत माहिती अशी की, पालघर तालुक्यातील एडवन गावातील ग्रामस्थ आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन गेल्या दहा वर्षांपासून वाईचा गणपती व मांढरच्या काळुबाईच्या दर्शनासाठी येत असतात. शनिवारी (दि.१५ रोजी) दुपारी हे पर्यटक वाईत आले होते. दुपारी वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी (एम.एच.०४ जी.पी.०८७६) या लक्झरी बसने पोचले असता
बसचा चालक गणपती पुलावर साईटला बस पार्क करत असतानाच तेथे गुरेबाजार झोपडपट्टीतील मुलांबरोबर बस लावण्याच्या जागेवरून चालकाची किरकोळ बचाबाची झाली.
त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीची माहिती जवळच असलेल्या गुरेबाजार झोपडपट्टीत पसरली व तेथून महिला पुरुषांसह मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी आला आणि त्यांनी थेट बसवर दगडफेक करायला सुरुवात केली. यात बसच्या काचा फोडुन दगड बसमध्ये बसलेल्या पर्यटकांच्या डोक्यात आदळल्याने जितेंद्र प्रभाकर तरे (वय ४०), मोहन हरिचंद्र तरे (वय ६२), प्रतीक दिलीप तरे (वय २१) हे गंभीर जखमी झाले .त्यांना उपचारासाठी वाई पोलिसांनी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत .
या घटनेची माहिती वाईच्या पोलिसांना लागताच सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष कांबळे, फौजदार सुधीर वाळुंज, श्रावण राठोड, प्रेमजीत शिर्के, उमेश गहीण व इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळावर पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान याबाबतची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.