भरत शहा मित्र परिवार आणि महात्मा फुले ग्रुपच्या वतीने इंदापूरात कोविड योद्ध्यांचा सन्मान
सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर : भरत शहा मित्र परिवार आणि महात्मा फुले ग्रुपच्या वतीने इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य निरीक्षक मनोज बारटक्के व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र, गुलाब पुष्प व वाफेचे मशीन देऊन सन्मान करण्यात आला. इंदापूर येथील स्मशानभूमीमध्ये हा समारंभ पार पडला.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांचा अंत्यविधी करण्याचे काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी योद्ध्यांचा प्रवेशद्वारापासून संपूर्ण रस्त्यावर फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या करुन त्यांच्यावर पुष्प वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
आपल्या जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी, माणुसकी म्हणून रात्री-अपरात्री हे कर्तव्य त्यांच्या हातून घडत आहे. त्याबद्दल त्यांच्या कर्तव्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल आणि नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य विभागातील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा आणि महात्मा फुले ग्रुपचे अध्यक्ष पोपट शिंदे तसेच जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे, पत्रकार डॉ. संदेश शहा, पत्रकार सुरेश जकाते, ॲड. विलास बाब्रस, मयूर गुजर, बोरा शेठ, नगरपालिका आस्थापना प्रमुख गजानन पुंडे, अल्ताप पठाण, अशोक चिंचकर ,अंबादास नाळे, धनाजी भोंग यांच्या हस्ते या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले. नगरपालिका आस्थापना प्रमुख गजानन पुंडे यांनी आभार मानले.










