शिरूर : महान्यूज लाईव्ह
राज्याच्या राजकारणात सत्ता संघर्षात मोठमोठ्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी शिरूर येथे समृद्धी महामार्गावर अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या गंगावणे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
तीन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर बस अपघातात शिरूर येथील कैलास गंगावणे, पत्नी कांचन गंगावणे, मुलगी डॉ. सई गंगावणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर घटनेची माहिती कळताच मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी अचानक शिरूर शहरात रात्री उशिरा येऊन गंगावणे कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी सर्वांना आधार देत अपघाताची माहिती घेतली. अपघातात मृत्युमुखी पडलेले कैलास गंगावणे यांचे भाचे यांच्याशी अमित ठाकरे यांनी चर्चा करून दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी केली. दुर्दैवी मृत्यू झालेल्या कैलास यांचा मुलगा आदित्य हा विधी महाविद्यालयात शिकत असून त्यास भविष्यात काही मदत लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या पाठीशी खंबीर उभी राहील असे म्हणत त्यांनी कुटुंबीयांना आश्वस्त केले.
यावेळी मनविसेचे सचिव महेश ओवे, मनसे चे सरचिटणीस किर्ती कुमार शिंदे, मनविसेचे राज्य सचिव आशिष साबळे,राज्य उपाध्यक्ष हेमंत डांगे, जिल्हा जनहित कक्षाचे प्रमुख सुशांत कुटे, मनसे चे शिरूर तालुका उपाध्यक्ष रवी गुळादे,महिला आघाडीच्या डॉ वैशाली साखरे, शारदा भुजबळ, रमनलाल भंडारी, संदीप कडेकर, सुदाम चव्हाण, बंडू दुधाने आदी उपस्थित होते.
दरम्यान शिरूर शहरात आल्यानंतर विश्रांतीसाठी विश्रामगृह येथे थांबले असता,पत्रकारांशी त्यांनी औपचारिक संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, राज्यात शेतीचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत.परंतु राज्यातील प्रमुख नेते सत्तेच्या खेळात गुंतले आहेत. उद्धव व राज एकत्र येणार का याबाबत विचारले असता, एकदा प्रयत्न झालेला प्रतिसाद मिळाला नाही. इतर पक्ष काय करतात याचे मला घेणेदेणे नाही मी लोकांची कामे करतो तसेच अनेक मोठ्या पक्षात लोक सोडून जात आहेत. मात्र आमच्या पक्षात नियुक्त्या जोरात सुरु आहेत.
सध्या राज्यात सुरु असलेले किळसवाणे राजकारण हे खालच्या पातळीवर गेले असून राज्यातील जनता मनसे कडे मोठ्या आशेने बघत आहेत.आमचा पक्ष हा लोक फोडत नाही तर लोक जोडतो. फोडाफोडीच्या राजकारणातलं कळत नाही. परंतु पुढच्या पिढीसाठी हे चांगलं नाही. कुठेही जा परंतु तुम्ही लोकांसाठी काय करता हे महत्वाचं असे म्हणत त्यांनी पत्रकाराशी आपुलकीने संवाद साधत विचारपूस केली.