विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. सकाळपासूनच त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे हे अजित पवारांचं व्यंगचित्र काढतात, मिमिक्री करतात, त्याच्यापलिकडे त्यांना काहीही जमत नाही. जनतेने त्यांना नाकारलं आहे. त्यांचा एकच आमदार आहे. त्यांच्यासोबत जितकी माणसं होती, त्यातली काही माणसं सोडली तर बाकी सगळी त्यांना सोडून गेली आहेत,असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
तसेच माझ्यावर अतिप्रेम करणारे लोक माझ्याबाबतीत संभ्रम पसरवत असतात, माझं काम त्यांना बघवत नाही म्हणून अशा चर्चा केल्या जातात. असंही अजित पवार यावेळी म्हणाले. पत्रकार परिषद घेत असताना ठराविक खुर्च्या असतात. त्यामुळे सगळ्यांनी येऊ नका असं आम्हाला पवारसाहेब म्हणाले, म्हणून आम्ही आमच्या कामाला निघून गेलो. कारण त्यांचा आदेश हा शिरसावंद्य आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं होतं. पत्रकार परिषदेत उपस्थित न राहता अजित पवार दिल्लीला गेल्याचं सांगितलं जात होतं त्यावर आता अजित पवार यांनी उत्तर देत पत्रकार परिषदेत गैरहजर असण्याचं कारण सांगितलं आहे. तसचं, पुन्हा काही वावड्या उठू नयेत म्हणून त्यांनी स्वत:चा आठवड्याभराचा नियोजित कार्यक्रम सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांच्या राजीनाम्याचा विषय संपला आहे.आता आम्ही आमच्या कामाला लागलो आहोत. मी पत्रकार परिषदेत नव्हतो तर काहींनी सांगितलं की, मी दिल्लीला गेलो. पण मी पुण्यात होतो, त्यानंतर पुण्यातून मी पहाटे उठून दौंडला गेलो, तिथे माझा कार्यक्रम होता. त्यानंतर मी कर्जतला गेलो, तिकडची काम आटोपून मी आज, रविवारी बारामतीला आलो .
बारामतीला आज माझा मुक्काम आहे. त्यानंतर उद्या ८ मे ला गोरेगावला जाणार, तिकडे माझे काही कार्यक्रम, मेळावे आहेत. ते सगळं करुन दुपारी साताऱ्याला जाणार, तिकडे दुपारी, संध्याकाळी आमचे कार्यक्रम आहेत. त्यानंतर ९ मेला फलटणला माझा रामराजे निंबाळकर यांच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम आहे. १० मेला मी उस्मानाबाद, लातूरमध्ये आहे आणि ११ मेला मी नाशिकमध्ये आहे. तसंच, १२ ला मी पुणे दौऱ्यावर आहे,असं अजित पवार म्हणाले. आठवड्याभराचा कार्यक्रम सांगत अजित पवार यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मणिपूर दंगलीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले मणिपूरमध्ये दंगल भडकली आहे. तिथे महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अ़डकले आहेत. त्याबाबात मी प्रशासनाला लेखी पत्र लिहिलं आहे.त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मणिपूर प्रशासनाशी बोलून तसचं, केंद्र सरकारशी बोलून विद्यार्थ्यांना राज्यात सुखरुप परत आणावं,अस देखील अजित पवार यावेळी म्हणाले.