दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वाढत असलेल्या कोरोना रूग्णांमुळे पाटस येथे कोरोना रूग्णांसाठी कोवीड केअर सेंटर करण्यास शासनाने मंजुरी दिली. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, माजी आमदार रमेश थोरात यांनी याचे उदघाटन केले.
दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. तालुक्यातील सर्व कोवीड सेंटर रूग्णांनी भरले आहेत. काही रुग्णांना घरी किंवा खासगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. दौंड शहरात एक व तालुक्यातील यवत व स्वामी चिंचोली येथे असे तीन शासकीय कोवीड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाचे रूग्ण संख्या वाढत गेल्याने दौंड पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दौंड शहरातील तीन खासगी रूग्णालाय व तालु्क्यातील एक असे चार खासगी रूग्णालये ताब्यात घेतली. यामुळे तालुक्यात सात कोवीड सेंटर झाली. आता पाटस येथील नागेश्वर विद्यालयात आठवे कोविड केअर सुरू करण्याची मंजुरी दौंडचे प्रभारी तहसीलदार हनुमंत म्हैत्रे यांनी दिली.
या कोवीड सेंटर मध्ये वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. शिवराणी पांचाळ, डॅा.रुपाली भागवत, डॉ. संतोष टेकवडे, निता वणवे, रूपाली चितारे,सचिन जराडे, राजेंद्र म्हस्के, शंकर दिवेकर, संदीप लांडगे असे एकुण नऊ अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे.
याबाबत वरवंड च्या आरोग्य अधिकारी डॅा. पांचाळ यांनी सांगितले की, सध्या नागेश्वर विद्यालयाच्या सात वर्ग खोल्यांमध्ये 50 खाटांची सोय करण्यात आली आहे. शासनाकडून तपासणी किड उपलब्ध झाल्यास तपासणी करण्यात येईल.
यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सभापती सारीका पानसरे, दौंड पंचायत समितीच्या सभापती आशा शितोळे आदी उपस्थित होते.










