बारामती प्रमाणेच इंदापूर ही प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करा : नगराध्यक्षांची मागणी
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर उतारा म्हणून बारामती शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून सोमवारपासून बारामतीत चौदा दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे, त्याच पार्श्वभूमीवर इंदापुरमध्ये ही बारामती पाठोपाठ रुग्ण संख्या वाढत असल्याने इंदापूरच्या नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे इंदापूर शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात ही बारामती प्रमाणेच कोरोनाचे रुग्ण वाढत असून दररोज हा आकडा 70 रुग्णांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत इंदापूरमधील परिस्थिती बिकट होऊ लागल्याने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी इंदापूर शहर हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावे व याही क्षेत्रामध्ये हे सर्व नियम लागू करावेत अशी मागणी अंकिता शहा यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे आज केली आहे.
चार दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका व्हिडिओ द्वारे इंदापूर तालुक्यातील नागरिकांना कळकळीचे आवाहन केले होते. यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आपण सोशल डिस्टंसिंग पाळावे, मास्क वापरावेत, अन्यथा इंदापूर तालुका लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा भरणे यांनी दिला होता.
त्यानंतर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील इंदापूरकरांना आव्हान केले होते, आज नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी थेट प्रांताधिकार्यांना पत्र लिहून इंदापूर शहर प्रतिबंधित क्षेत्र करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे बारामती प्रमाणेच आता इंदापूर तालुक्यात ही इंदापूर शहर लॉकडाऊन होणार का? याची उत्सुकता असून इंदापूर शहराप्रमाणेच तालुक्यातही नेमकी काय परिस्थिती राहणार याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.










