नानाची टांग
एकदा आमच्या गावांमधी… अवदसा शिरली रानामंदी.. हुसकावण्या तिला मग, सारी केली जमाबंदी.. अवदसा भारी खतरनाक, शिरते म्हणे नाकामंदी.. नाकामंदी शिरून,म्हणे. वेदना देते मरणप्राय.. धूड होतं मोठं तिचं.. मोठे हात मोठे पाय.. विमा कंपन्या घशात घालून तिची सारी दुधात साय.. अप्पा, मंग्या, राम्यासुदीक सारे पळाले एकसाथ.. अवदसेनं साऱ्यांच्या,मग. पेकाटात घातली लाथ.. दुध सुध्दा खाल्लं तिनं.. म्हस फक्त बोंबलत राहीली.. १८ रुपये हातात फक्त, अन चरवी मात्र रिती राहीली.. गोठा सारा रडत राहतो, अन शेतकऱ्यालाही लागली हाय.. कसला महाविकास…अन कसलं काय..!!
परवा आमच्या गावांमधी…
सात दिवस फक्त कोरोनाचे कोरोनाला रोखण्याचे.. कोणी शहाणे सांगत राहीले.. गाव बंद करण्यासाठी… पोलिस गावभर फिरत राहीले.. विनामास्कच्या भटक्यांनी ६६ लाख भरले.. पण तरीबी रस्ते सारे गर्दीने फुलले.. भटके सारे, बघा छाती ठोकूनी कसे म्हणाले? भले १ कोटी भरू…पण गावभर फिरू कोण अडवितो आम्हा, अन कदर कशाची करू. कोरोनाची लढाई कसली..जिंकू किंवा मरू..!
आज आमच्या देशामंदी…
१४ जूनपासून आजपतोर टिव्ही बोंबलत राहीला.. फक्त कंगना, रिया..दुनियाभर फेमस झाली रिया.. पावसात गेली पिके वाहून..अन गायब झाला युरीया.. रिया, कंगनाच्या नावाने राजकारण आहे सुरू… गर्दुल्यांसाठी आमचा जीव, २४ तास डिबेट करू..
ड्रॅगन साऱ्या बांधावरती, बसला आहे लपून.. रातीच्या अंधारात डाव साधाया जपून.. जवान आमचा घट्ट मनाचा, आहे पाय रोवून नेम धरूनी बसतो, तिथे रातीचा दिस करून त्याच्यासाठी, ना कुणाला खेद नि खंत आहे..! डिबेटमध्ये रियाशिवाय कुणाला जागा आहे?
तो गर्दुल्या गेला मरून….त्याची उकरण सुरू आहे.. एका मृत्यूपायी तीन महिने पुराण जणू सुरू आहे.. जणू होता महापुरूष, दुखवटा त्याचा मांडायला.. चार मैत्रिणी अन गर्दचा व्यापार सारा मांडलेला.. आभासाच्या दुनियेला आम्ही चंदेरीची हवा म्हणतो.. बाप आमचा हवेविना हो, बारा तासात मरतो…
पत्रकारडे भिकार झाले, चौथा स्तंभ निखाळला देशापुढचा प्रश्न कोणता, पर्वा नाही आम्हाला.. रिया पेक्षा नोक-रियांची गरज जास्त तरुणाईला.. परदेशाचा मिडिया देखील आमच्या माध्यमांना लाजला.. अर्णवसारखा देखील अॅंकर असतो, देशाने या पाहिला..
नेता आमचा कंपन्या अन विमानतळ जेव्हा विकतो.. व्हाटसापवरती अंधश्रध्देच्या पोस्ट आम्ही फिरवतो.. सारा अंधा कानून आमचे डोळे दिपवतो आहे.. आम्ही मात्र काळा गॉगल डोळ्यावर लावतो आहे.. मुंबई पाकिस्तानसारखी कोणाला तरी भासते आहे…. प्रतिज्ञेचे वाक्य मग ते खोटे का? भारत माझा देश आहे…
अहो, जिथे जनावरांचा डॉक्टर कोरोनाला रोखतोय.. क्वारंटाईनच्या लोकांना जेवण कोण घालतोय… जेवणाच्या कंत्राटासाठी सुध्दा राजकारण करावे लागते… डॉक्टर जातो जिवानिशी, अन रोग्यासाठी कोण रडते..
कोरोना कोणासाठी आपत्ती, तर इष्टापत्ती सुध्दा आहे.. गाव, शहरांत आता फुक्या उपचाराची मारामार आहे… पैका ज्याचा मोठा, त्यालाच व्हेंटीलेटर आहे..
विमा कंपनी पिके खाते, आता माणूस खाणार आहे.. माणसांच्या मढ्यावरती त्यांचा प्रिमियम ठरणार आहे..
नाना सारखा सांगून बघतो, टांग सारखी मारून जाईन… समाजाला शहाणे करण्या, फटकारे हे ठोकत राहीन.. जर गुन्हा असे हा, तर मी पुन्हा पुन्हा करीत राहीन..!!










