बिजींग : चीनमध्ये कोरोना व्हायरसने आतापर्यंत 370 जणांचा बळी घेतला असून एकट्या चीनमधील या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या तब्बल 18 हजारांवर पोचली आहे.
चीनच्याच सरकारी आरोग्य खात्याने ही माहिती दिल्याने जगभर हे संकट मोठ्या प्रमाणावर घोंगावणार हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. चीनमध्ये वुहानशी संपर्क तोडल्यानंतर कोरोना विषाणूची चर्चा अधिकच वाढली असून भारतातही चीनमधून येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्य़ाची पूर्ण चाचणी झाल्याशिवाय त्याला घरी सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने स्वाईन फ्ल्यूनंतर जगावर घोंगावणारे कोरोना विषाणूचे संकट आता भारतातही चिंतेची बाब बनले आहे. वैद्यकीय क्षेत्रात यापूर्वी कधीच या विषाणूचा माणसाला संसर्ग झाला नाही. चीनमध्ये एकट्या वुहानमध्ये 5 हजार हून अधिक जण या विषाणूने बाधित झाले आहेत. स्वाईन फ्ल्यूप्रमाणेच ताप, खोकला, घशात वेदना व श्वास घेण्यात अडथळे ही कोरोनाची लक्षणे आहेत. आतापर्यंत कोरोना विषाणूचे 6 प्रकार माहिती होते. मात्र आता हा सातवा विषाणू एनसीवोव्ही हा जगातील संशोधकांपुढे नव्याने आला आहे. का होताहेत कोरोनासारखे विषाणू? जगभरात आतापर्यंत एचआयव्ही, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला या विषाणूंना खळबळ उडवली. जनावरांपासून, प्राण्यापासून किंवा पशुपक्ष्यांकडून हा विषाणू माणसांपर्यंत पोचला आहे, आताही कोरोना हा देखील समुद्री जिवांकडूनच माणसांपर्यंत पोचल्याचे सांगितले जात आहे.










