इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येवरून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी व लोकप्रतिनिधी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना लक्ष्य केले आहे.
दोन दिवसांपूर्वी दत्तात्रेय भरणे यांनी एका व्हिडीओद्वारे कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन इंदापूकरांना केले होते, प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी नवा व्हिडीओ प्रसारीत करीत भरणे यांच्यावर कुरघोडी केली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी इंदापूरच्या कोरोना उपचाराची पोलखोल करीत भरणे यांच्यावर आरोप केले आहेत.
हर्षवर्धन पाटील यांचा व्हिडिओ इथे अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता.
या व्हिडीओमध्ये पाटील म्हणतात, इंदापूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून इंदापूरच्या जनतेने आता आपली काळजी आपणच घ्यावी अशी वेळ आली आहे. कारण लोकप्रतिनिधींचे हे अपयश आहे. इंदापूर तालुक्यात सध्या व्हेंटीलेटर नाहीत, ऑक्सिजन रुग्णांना वेळेत मिळत नाही. ४५ मृत्यू तालुक्यात झाले आहेत. लोकप्रतिनिधींचे ध्येय वेगळेच आहे , त्यांना कोरोनाच्या नियंत्रणात कुठलेही स्वारस्य नाही. त्यामुळे जनतेने स्वतःहूनच काळजी घेण्याची वेळ आली आहे.











