महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कंगना प्रकरणावरून दुबईतून वर्षा निवासस्थानी व मातोश्रीवरही धमकीचे फोन आल्यांनतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला आहे. कंगना राणावतबद्दल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरून हा फोन आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही धमकीचा फोन आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मुंबई क्राईम ब्रॅंच या धमकीच्या फोनची चौकशी करणार आहे असे सूत्रांनी स्पष्ट केले.
कंगना प्रकरणावरून दुबईतून हे फोन का येत आहेत? हा प्रश्न आता वेगळे वळण घेऊ पाहत असून भाजपने अगोदर कंगना राणावतची पाठराखण केली होती, आता दुबईतूनही तिची पाठराखण केली जात असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकासआघाडीकडून होऊ लागला आहे. त्यामुळेच कंगना प्रकरण आता अधिकच चिघळणार असे दिसू लागले आहे.
दुसरीकडे केंद्र सरकारने कंगना राणावतला वाय दर्जाची सुरक्षा दिलेली आहे, त्यावरूनही राज्यात भाजप विरोधात संतापाचे वातावरण आहे.
पवारसाहेब देशाचे नेते असून मातोश्री आमचे श्रध्दास्थान आहे. पवारसाहेब किंवा मातोश्री सोडा, साध्या कार्यकर्त्याच्या अंगाला हात लावण्यासाठी दाऊदच्या पाच पिढ्या खाली आल्या तरी शक्य नाही – एकनाथ शिंदे, मंत्री.
आपण कायद्याच्या राज्यात राहतो, आतंकवाद्यांनाही सुरक्षा द्यावी लागते, तिने चुकीचे वाक्य वापरले, म्हणून तिला सुरक्षा दिली जात नसेल तर ते चुकीचे आहे. संविधानाने दिलेल्या अधिकार, कायद्यानुसार कंगनाला सुरक्षा दिली पाहिजे. तिचेजे वाक्य चुकीचे असेल, तर त्याचा निषेध केला पाहिजे – देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.











