बारामती : महान्यूज लाईव्ह
मासिक पाळी- स्वच्छता व लिंगभाव शिबीर हे महिला शिक्षिकांनी शाळेत कसे शिकवावे यासाठी कर्जत व जामखेड तालुक्यात आमदार रोहीत पवार यांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
आमदार रोहित पवार व सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून व स्वस्थ कन्या उज्ज्वल भविष्य योजना, कर्जत जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशनतंर्गत सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांनी दीड लाखाहून अधिक मुलींशी मासिक पाळी, सॅनिटरी पॅडचे महत्त्व, शिक्षण, करियर, लग्न, प्रेम प्रकरण, अल्पवयीन माता, आदी विषयांवर मुलींशी संवाद साधून त्यांना बोलते केले. याच्या पुढील टप्प्यात मासिक पाळी- स्वच्छता व लिंगभाव शिबीर हे महिला शिक्षिकांनी शाळेत कसे शिकवावे यासाठी कर्जत व जामखेड तालुक्यात आमदार रोहीत पवार यांच्या माध्यमातून हे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले आहे.
कर्जत मधील 82 गावातील एकूण 120 शाळेतील 110 शिक्षिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. जामखेड मधील 41 गावातील 41 शाळांमधील 54 महिला शिक्षकांनी यात सहभाग नोंदवला. सदर शिबिरामध्ये अॅड. प्रवीण निकम व कौस्तुभ जोगळेकर यांनी मासिक पाळी विषयी समाजातील समज – गैरसमज, मासिक पाळी त्या काळातील स्वच्छता कशी ठेवायची याविषयी विस्तृत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. तसेच, कार्यशाळेमध्ये उपस्थित महिला शिक्षकांनी वर्गात मुलींचे प्रबोधन कसे करावे याचे ही अत्यंत सोप्या शब्दात समजून सांगितले.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून राबवलेल्या या शिबिरामुळे आज अनेक महिला शिक्षिका मासिक पाळी विषयी मोकळा संवाद साधतील. यामुळे, विद्यार्थींनी व शिक्षिकेमधील दुरावा कमी होईल व मुलींचेही भविष्यात होणारे नुकसान टळू शकेल.










