बारामती : महान्यूज लाईव्ह
व्यवसाय आणि उद्योगांवर संक्रमण नको म्हणून बाजारपेठा व व्यवहार सुरू ठेवले, परंतु नंतर बारामती आणि बारामती तालुक्यात कोरोनाचा जो उद्रेक झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन बारामती येत्या ७ सप्टेंबरपासून १४ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक समजते..
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक महत्वाची बैठक सुरू असून या बैठकीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ पदाधिकारी, औद्योगिक वसाहतीच्या वतीने धनंजय जामदार, प्रमोद काकडे यांच्यासह प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुक्यातील विविध खात्यांचे अधिकारी तसेच कोरोनाविरोधात लढणाऱ्या सर्व घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या लॉकडाऊन संदर्भातील नियम, अटी व इतर माहिती प्रांताधिकारी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी महान्यूज लाईव्हशी बोलताना दिली.
बारामतीत गेल्या तीन दिवसात तीनशेहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. हा बारामतीतील गेल्या पाच महिन्यांतील उच्चांक आहे, मात्र यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आला असून अजूनही बारामतीतील वातावरण शिथील ठेवल्यास कोरोनाचा आणखी उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा एकदा बारामतीत लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.










