बारामती : महान्यूज लाईव्ह
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात माजी आमदार सुरेश धस यांनी बॅंक अधिकाऱ्याचे पाय धरून पुजा केली. या प्रकाराने बॅंक अधिकाऱ्यांची मानसिकता खच्ची केल्याची ओरड आता काही राजकारणी उठवतील, मात्र लोकभावना लक्षात घ्या व उपाययोजना करा. नाहीतर यापुढील काळात बॅंक अधिकाऱ्यांना गावागावात सर्रास अशाच पध्दतीने शेतकऱ्यांच्या व सुशिक्षित बेरोजगारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
बॅंकेच्या दारात गेलेल्या अपवादात्मक शेतकऱ्यांना वगळता इतर शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांचे अधिकारी कशी वागणूक देतात हे साऱ्यांनाच माहिती आहे. आष्टी तालुक्यात १७०० कर्ज फाईलींपैकी केवळ ५० फायली मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याचे पाय धुवून पूजा करणाऱ्या माजी आमदार सुरेश धस यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे..धस यांनी यामध्ये शिव्या दिल्या असल्या तरी शेतकऱ्यांना मात्र हा व्हिडीओ आवडला, कारण ती शेतकऱ्यांची, युवा बेरोजगारांची सार्वत्रिक मानसिक भावना आहे. बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची मानसिकता न बदलल्यास गावागावात त्यांचे असेच, किंबहूना यापेक्षा वाईट पध्दतीने सत्कार झाल्यास वाईट वाटायला नको.
कोरोनाच्या काळात शेतीचे अतोनात नुकसान झाले, तरीदेखील शेतकरी तगून राहीला. याउलट सध्या इतर कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणूक होत नाही, मात्र शेतीतली गुंतवणूक कितीतरी पटीने वाढली.
अर्थात शेतीशिवाय पर्याय नसल्याने ही गुंतवणूक असली तरी देखील ग्रामीण भागात सावकारी मोठ्या प्रमाणावर याच काळात वाढली आहे, ही वाढण्यामागेही बॅंकांचीच सोईस्कर उदासिनता कारणीभूत आहे.
या संदर्भातील व्हिडिओ इथे अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता
माजी आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांना कुत्रा लावला, घोडा लावला असा शब्दप्रयोग केला आहे, हा शब्दप्रयोग शिवीगाळीचा असला तरी ग्रामीण भागात हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जातो. त्यामुळे धस यांची गांधीगिरी राजकीय असली, तरी ती शेतकऱ्यांची सार्वत्रिक भावना आहे, याकडे या गदारोळात दुर्लक्ष व्हायला नको.
मोठमोठ्या उद्योगपतींच्या कर्जाकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या बॅंका शेतकऱ्यांना दारात उभ्या करीत नाहीत हा अनुभव येत नाही का? सुरेश धस यांनी तर व्यवस्थित पूजा करून अधिकाऱ्यास सन्मानाने पाठवले असेल, मात्र गावागावात जाऊन फक्त शेतकऱ्यांना प्रतिक्रिया विचाराव्यात की, बॅंका तुम्हाला कशी वागणूक देतात? गावातील कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण घेतलेल्या, पदवीधर होऊनही गावातच फिरणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना जाऊन विचारा की, बॅंकांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिला?
बॅंक अधिकाऱ्यांनो, भानावर या
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते म्हणाले, बॅंकांनी या कोरोनाच्या काळात खातेदारांना उन्हात उभे केले. सामान्य माणसांच्या ठेवी व पैशावर या बॅंकांमधील नोकरांची नोकरी चालत असेल तर शेतकऱ्यांची, खातेदारांची कदर व्हायला हवी. मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. पंधरा एकर द्राक्ष शेती असलेल्या शेतकऱ्याचीही बॅंकेत पत राहीलेली नाही, नव्हे या मुजोर अधिकाऱ्यांनी ठेवलेली नाही. अधिकारी फक्त त्यांना भेटण्यासाठी देखील तास न तास खातेदारांना झुलवत उभे करतात. यापुढील काळात शेतकऱ्यांनी अशा अधिकाऱ्यांना थेट झोडपले पाहिजे. नोडल बॅंकिंग असोसिएशनचा तालुका अध्यक्ष हा तहसीलदार असतो, मात्र कोणत्याही तालुक्यात तहसीलदार कधीच बॅंकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपला अधिकार वापरत नाही. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून सरकारने सध्या बॅंकांमध्ये सोने तारण ठेवण्याचे प्रमाण किती वाढले आहे याची माहिती घ्यावी.











