इंदापूर : महान्युज लाईव्ह
जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होताच डॉक्टर राजेश देशमुख यांनी इंदापूर दौंड बारामतीचा कोरोना आढावा घेतला होता, त्यानंतर 11 दिवसात पुन्हा आज ते दौंड आणि इंदापूर तालुक्यात भेट देत आहेत. इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत त्यांची बैठक होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर दौंड व बारामती या तालुक्यांमध्ये कोरोना चा प्रसार अधिक वेगाने होत असून येथील मृत्यू दरही वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या तीनही तालुक्यांसह पुरंदर तालुक्याचा देखील दौरा केला होता.
त्यानंतर आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौंड व भिगवण येथे भेट देणार आहेत. सकाळी ते दौंड तालुक्यातील यवत कोविड केअर सेंटर येथे पाहणी करणार असून त्यानंतर दौंडच्या नगर परिषदेच्या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करणार आहेत.
त्यानंतर दुपारी एक वाजता इंदापूर तालुक्यातील कोरोना आढावा बैठक होणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समवेत ते बैठकीत सहभागी होतील. त्यानंतर भिगवण येथील केअर सेंटरची ते पाहणी करणार आहेत.










