दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालक्यातील गिरीम मध्ये काल रात्री बिबट्याने शेतकरांच्या शेळ्यावर हल्ला करून त्यांची शिकार केल्याची घटना घडली.
बिबट्याच्या हल्लात एक शेळी दगावली आहे. दरम्यान दौंड परिमंडल वनअधिकारी चैतन्य कांबळे यांनी या भागाची पाहणी केली आहे.
मागील दोन दिवसापुर्वी दौंड शहरालगत असलेल्या दौंड ते कुरकुंभ मार्गावरील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. सातच्या परिसरात काही नागरीकांना बिबट्याने दर्शन दिले होते. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा ही लावला होता, मात्र बिबट्या पश्चिम दिशेला असलेल्या गोपाळवाडी गिरीम भागातील वाड्यावस्त्यावर ऊसाचा पटा व ओढ्या नाल्यांनी फिरत असल्याचा नागरिकांना संशय आहे.
काल रात्री गिरीम गोपाळवाडी रोडलगत असलेल्या गिरीम येथील शेतकरी पवन थोरात यांच्या घरासमोर लावलेल्या एका शेळीवर बिबट्याने हल्ला करून त्यांची शिकार करण्याचा प्रयत्न केला,मात्र या हल्लात शेळी दगावली.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. गिरीम व कुरकुंभ एमआयडीसी लगत वनविभागानचे अभयारण्य आहे. या अभयारण्यात हरीण काळवीट, कोल्हे तरस, लांडगे आदी वन्यप्राणी आहेत. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी पिंजरा लावण्याचे आश्वासन कांबळे यांनी शेतक-यांना दिले आहे.











