महान्यूज: आजची गझल
आयुष्याचे ओझे इतके .. बोजड नाही ..
सहज शिरावर घेवू आपण ..अवघड नाही .
पुराणातल्या गोष्टी मीही खूप ऐकल्या ..
कसे म्हणावे गोष्ट एकही भाकड नाही .
आंदोलन वा निदर्शनावर बऱ्याच चर्चा ..
मते कुणाची स्पष्ट .. प्रभावी परखड नाही .
भिन्न वयाचे आपण दोघे मते वेगळी ..
म्हणून हल्ली जुन्या नव्याची सांगड नाही .
निकाल आधी.. म्हणे ठरवला आहे त्यांनी..
मग मैदाने जिंकायाची धडपड नाही .
श्रीमंतीचे व्यर्थ गोडवे मुखी मुलाच्या …
अन .. बापाच्या अंगी वितभर कापड नाही .
पुरुषांच्या ही बरोबरीने तिची भरारी ..
मुलगी म्हणुनी … मर्यादांचे जोखड नाही .
गझलकार-निलेश शेंबेकर, चिंचवड, पुणे.
सौजन्य:गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











वाह सुंदर