सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पुणे जिल्ह्यामध्ये डीसीपीएस धारक शिक्षकांचे एनपीएस(nps) खाते सुरू करण्यासाठी सर्व डीसीपीएस धारक शिक्षकांकडून खाते ओपनिंग फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवून त्यामध्ये असलेल्या त्रुटी व समस्यांचे निराकरण होईपर्यंत एनपीएस फॉर्म भरून घेण्याची घाई करू नये, अन्यथा न्यायिक मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे व सरचिटणीस वैभव सदाकाळ यांनी दिला.
याबाबतचे निवेदन पुणे जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटन च्या वतीने देण्यात आले आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या परिपत्रकान्वये शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे यांनी शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून सर्व 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या नंतरच्या सर्व डीसीपीएस धारकांनी शिक्षकांचे एनपीएस फॉर्म तात्काळ भरून घेण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्हा पेन्शन हक्क संघटन च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त व लेखाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक तसेच तालुकास्तरावर सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना एनपीएस खाते फॉर्म भरणे तात्काळ थांबवावे असे निवेदन देण्यात आले.
डीसीपीएस मधील रकमांचा हिशोब पूर्ण नाही, शिक्षकांना हिशोब चिठ्ठ्या प्राप्त नाहीत, आंतरजिल्हा बदली होऊन आलेल्या व होऊन गेलेल्या शिक्षकांच्या कपात रकमेचा ताळमेळ नाही, कपात झालेल्या रक्कमांवर शासन हिस्सा व व्याज यांचा ताळमेळ नाही, एनपीएस योजना कशा प्रकारे राबवली जाणार याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना संचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नाहीत , डीसीपीएस चे एनपीएस मध्ये रूपांतर झाल्यानंतर डीसीपीएस रक्कम बाबत कोणतीही स्पष्टता नाही तसेच केंद्र सरकारच्या धरती वर दिले जाणारे NPS चे फायदे याबाबत स्पष्टता नाही अशा सर्व त्रुटी बाबत कोणतीही उपाययोजना न करता फॉर्म भरून घेण्याची घाई केली जात आहे. फॉर्म भरून घेणे तात्काळ थांबवावे असे संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे कळवले आहे. यावेळी सचिन वारे, मंगेश शेंडे, विनायक शिंदे, योगेश ठोसर, सोमनाथ कुदळे उपस्थित होते.
अपयशी DCPS योजना राबवून गेली १५ वर्ष कर्मचाऱ्यांचे शासनाने अतोनात नुकसान केले आताही कर्मचाऱ्यांनी न मागता NPS योजना लादून भविष्य अंधकारामय न करता शासनाने नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी – संतोष गदादे, जिल्हाध्यक्ष पुणे










