इंदापूर तालुक्यातील न्हावी येथे मित्राच्या उपचारासाठी गोळा केले साडेपाच लाख रुपये
सुरेश मिसाळ : महान्यूज लाइव्ह
इंदापूर : मैत्री असावी कशी? जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी या एलआयसीच्या स्लोगन सारखी… तशीच ती असावी, इंदापूर तालुक्यातल्या न्हावी गावातल्या मुलांसारखी.. ज्यांनी आपल्या बीएससी ॲग्री असलेल्या शेतकरी मित्राच्या उपचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल साडेपाच लाख रुपये गोळा केले आणि त्याचे प्राण वाचवले. अन एका शेतकऱ्याच्या आयुष्यात नंतरच्या काळात कर्जाचा डोंगर झाला असता तोही मिटवला एका क्षणात..!!
या कहाणीची सुरुवात होते दहावी येथील गणेश बाळू जाधव या बीएससी ऍग्री पदवी घेतलेल्या युवकापासून.. शेतकऱ्याचा हा मुलगा जीवाभावाच्या मित्रांना देखील धरून आहे.
शेतामध्ये काम करताना एक ऑगस्ट रोजी त्याला शेतात साप चावला. साप चावल्याचे त्याला समजले नाही आणि तो घरी येऊन त्याने विश्रांती घेतली. मात्र त्रास वाढत गेला आणि त्यानंतर मात्र घरच्यांना समजले की, त्याला विषारी काहीतरी चावले आहे. गणेशला घेऊन त्याचे कुटुंबीय इंदापूर येथे तातडीने गेले, परंतु त्याची प्रकृती अत्यवस्थ बनू लागल्याने इंदापूर मधील डॉक्टरांनी त्यांना अकलूज येथे जाण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर अकलूज येथील एका खासगी दवाखान्यांमध्ये गणेश वरती उपचार सुरू झाले. हे उपचार सुरू होत असताना घरात जमवलेले व काही अचानक लागतात म्हणून ठेवलेले सारे पैसे संपून गेले.
आता काय करायचे हा प्रश्न पुढे उभा राहिला, त्यावेळी गणेशच्या वडिलांनी गणेशचे मित्र तुषार भोसले, सुरज भोसले, बाबू मुलांनी व इतरांच्या कानावर ही माहिती घातली.
आता माझ्या हातात काहीच राहिले नाही, तुमचा मित्र आहे, त्याला कसे वाचवायचे तुम्ही ठरवा असा निर्वाणीचा संदेश त्यांनी तुषार भोसले या युवकास दिला. आणि गहीवरलेल्या तुषार भोसले यांनी तातडीने एक फोटो इमेज तयार करून त्यावर ती देवाक-काळजी-रे या गाण्याची धून टाकून आपल्या मित्राला मदत करा असे आवाहन केले.
यामध्ये तुषार यांनी स्वतःचा फोन पे क्रमांक आणि बाबू मुलांनी यांचा गुगल पे क्रमांक टाकून त्यावर पैसे पाठवण्याचे आवाहन केले. तुमचा पै न पै चांगल्या सत्कार्यासाठी लागणार आहे अशा प्रकारचे अर्जवही त्यांनी यामध्ये केले होते.
हा फोटो इमेज चा व्हिडिओ पाहता पाहता व्हायरल झाला आणि काय आश्चर्य! पुण्या-मुंबई पासून ते ते वेगवेगळ्या जिल्ह्यापर्यंत अनेक ठिकाणांहून पैशाचा अक्षरशः पाऊस पडला. यामध्ये किती पैसे जमा झाले असावेत?
थोडेथोडके नाही.. तब्बल पाच लाख अकरा हजार रुपये.! या भरून गेल्या ओंजळीने मित्र गहिवरले.. या समाजामध्ये संवेदनशीलतेने पुढे येणाऱ्या दात्यांची संख्या कमी नाही असा एक चांगला मेसेज देखील यानिमित्ताने गेला.
गणेश्वर हे यशस्वीरित्या उपचार झाले आणि गणेश जीवन-मरणाच्या लढाईतून अपयशावर मात करत बरा झाला. परंतु समाजाच्या दात्यांची मात्र कमी नव्हती ती तशीच कायम राहिली.
खरेतर पैसे अजून जमा होत होते, परंतु त्याचे उपचाराचे बिल सात लाख 20 हजार रुपये झाले होते. दोन लाख रुपये कुटुंबीयांनी भरलेले होते, त्यामुळे या मित्रांनी पुन्हा आवाहन केले की, समाजाने भरभरुन दिलेल्या या दानामुळे आपल्या मित्राचे प्राण वाचले आहेत.. तेव्हा आता कोणीही पैसे पाठवू नयेत..
दहा रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंतची वर्गणी मदत या मित्राला झाली होती. गणेशचे मित्र या अनपेक्षित रित्या व भरभरून मिळालेल्या मदतीने अजूनही भारावून गेलेले आहेत.आपण एखादे चांगले काम हाती घेतले, तर समाज भरभरून देतो. अगदी कविवर्य ना. धो. महानोर यांच्या भाषेत सांगायचे झाले तर, या नभाने या भुईला दान द्यावे, अन या मातीने चैतन्य गावे, अशी कोणती पुण्य येती फळाला..की, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे..!! अगदी अशीच भावना येथील गणेश मित्रांची झाली आहे..!











