बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यातील दुध अनुदान म्हणजे सरकारच्या १५० कोटींवर सर्व पक्षातल्या दुध सम्राटांनी घातलेला दरोडा आहे, सरकारने पैसे दिले, मात्र या लोकांनी हे पैसे लाटले, दुधाचा दर शेतकऱ्यांना दिला नाही असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी बारामतीतील मोर्चादरम्यान केला.
राज्य सरकारने दुधास २७ रुपये दर द्यावा व व केंद्र सरकारने दुधाची भुकटी आयातबंदी करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बारामतीत शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जनावरांसह प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
हा मोर्चा शारदा प्रांगणातून निघाला, तो प्रांताधिकारी कार्यालयासमोर अडविण्यात आल्यानंतर शेट्टी यांनी दुध उत्पादक आंदोलकांची सभा घेतली. या सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालींदर पाटील, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, दशरथ राऊत यांच्यासह स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले,राज्य सरकारने अतिरिक्त दुधाची खरेदी करण्यासाठी अनुदान दिले. राज्यातील अनेक दुध संघांनी हे दुध सरकारला विकले, सरकारकडून अनुदान घेतले, मात्र शेतकऱ्यांना हा दर दिलाच नाही. २५ रुपये दर देतो म्हणून सरकारला दुध विकलेल्यांनी ५ रुपये अनुदान लाटले, हा दरोडा आहे. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीबाहेर पडून महाराष्ट्रात काय चालले आहे हे पहावे. या दुध संघात शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस सारे नेते आहेत. थोडक्यात विरोधी पक्षही यातून सुटलेला नाही. ही सारी मिलीभगत आहे. मात्र दररोज अडीच कोटी सरकारच्या तिजोरीतून लूट करणाऱ्या या बोक्यांचा विचार न करता सरकारने जर थेट दुध उत्पादकांच्या खात्यात अनुदान जमा केले, तर थेट दुध उत्पादकांना त्याचा फायदा होईल, मात्र सरकारही अशांनाच सामील आहे. बारामतीत नऊ वर्षापूर्वी आलो आणि उसाचा दर मोजून घेतला. आताही बारामतीत आलो आहे, चालत आलो आहे, शिस्तीने आलो आहे, आम्हाला चालही करता येते.
जालींदर पाटील म्हणाले, गायीचे मूत्र देखील १५० रुपये लिटरने विकले जाते, आमच्या दुधाला १७-१८ रुपये दर देता, सरकारला लाज वाटत नाही? आम्ही शिस्तीत आंदोलन करतो आहोत, म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका.
अमरसिंह कदम म्हणाले, केवळ मोर्चा काढणार म्हटल्यावर नोटीसा दिल्या गेल्या. मात्र शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही.
गाढविणीच्या दुधाएवढीही अक्कल सरकारला नाही..
गाढविणीचे दूध देखील या देशात ७ हजार रुपये लिटरने विकले जाते, गायीच्या दुधाबाबत मात्र राज्यातल्या व देशातल्या गाढवांना काही कळत कसे नाही हा सवाल आहे अशी टिका राजू शेट्टी यांनी यावेळी केली.










